‘या’ महिन्यात कमी होणार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती, स्वतः पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. डिझेल ने ९० च्या आसपास तर पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत विरोधक आक्रमक आहेत. सर्वसामान्यही त्रस्त असून किमती कधी कमी होतील, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत निवेदन दिले आहे. प्रधान म्हणाले की, पेट्रोलियम उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे जेणेकरुन भारतीय ग्राहकांना इंधनाच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा मिळेल.

जास्त मागणीमुळे वाढतायेत तेलाचे दर
वाराणसीत माध्यमांशी बोलताना पेट्रोलियममंत्री म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे मागणीत मोठी घसरण झाल्याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तेल उत्पादक प्रमुख देशांनी उत्पादन कपात करण्याचा निर्णय घेतला. हे देश अधिक पैसे मिळवण्यासाठी कमी इंधन तयार करीत आहेत. इंधनाचे उत्पादन अद्याप कमी केले जात असताना. यावेळी इंधनाची मागणी वाढली आहे. कारण परिस्थिती हळूहळू आता पूर्वपदावर येत आहे. वाढती मागणीमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.

एप्रिलपर्यंत किंमत खाली येण्याची अपेक्षा
देशातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींबद्दल विचारले असता प्रधान म्हणाले की, याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही पण स्वयंपाक गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती मार्च किंवा एप्रिलपर्यंत कमी करता येतील. शुक्रवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, हिवाळ्याचा हंगाम संपताच तेलाच्या किंमती कमी होतील. वाढत्या मागणीमुळे भाव जास्त आहेत. हे बहुतेकदा हिवाळ्यात होते. त्यामुळे लवकरच किंमती खाली येतील.