येरवडा जेलमधील कैद्याकडून पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नातेवाईकासोबतची बोलण्याची वेळ संपली असल्याचे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कैद्याने जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार येरवडा कारगृहातील मुलाखत कक्ष येथे शनिवारी घडला. याप्रकरणी कैद्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्यावरच तो थांबला नाही तर या कैद्याने अंतर्गत दुरध्वनी संचही (इंटरकॉम) फोडला.

संदिप संसारसिंग धुने (रा. येरवडा मध्यवर्ती कारागृह) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. तर या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सोमाजी कोकाटे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाजी कोकाटे हे येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. येरवडा कारागृहातील मुलाखत कक्षाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसाठी बोलण्यासाठी इंटरकॉम सुविधा देण्यात आली आहे. कैद्यांना नातेवाईकांशी बोलण्यासाठी ठराविक वेळ देण्यात येते. कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या संदिप धुने याचे नातेवाईक शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास कारागृहात आले होते. संदिप याला नातेवाईकांशी बोलण्यासाठी खिडकी क्रमांक पाच मध्ये आणण्यात आले होते.

तो आपल्या नातेवाईकांशी बोलत असताना कोकाटे यांनी त्याला वेळ संपल्याची समज देऊन त्याला तेथून जाण्यासा सांगितले. फिर्य़ादी यांनी इंटरकॉमचे बटन बंद केल्याने चिडलेल्या धुने याने पुन्हा बटन सुरु केले. तेसच आपण मनोरुग्ण असून सर्वकाही तोडून-फोडून टाकेल, तुलाही जीवे मारेन अशा शब्दात धमकी दिली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने इंटरकॉमचा संच खाली आपटून फोडून टाकला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like