पेड न्यूजप्रकरणी ‘या’ दोन प्रतिस्पर्धींना नोटीस 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन –  लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत प्रचारादरम्यान पेड न्यूजसारखी प्रकरणं समोर येतात. बीडच्या निवडणूक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी बीडमधील भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे  आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस बजावल्या आहेत. मतदारसंघात प्रचारादरम्यान डॉ. प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी वृत्तपत्रे आणि माध्यमांद्वारे प्रचारासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढाई आहे. दोघांनी मोठ्या प्रमाणात आपली ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. शेवटच्या टप्प्यात त्यांनी विविध अस्त्रांचा वापर प्रचारासाठी केला. दरम्यान भारतीय जनता पक्षाने बीड लोकसभा मतदारसंघात सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे छायाचित्र वापरून जाहिरात केली. त्यात त्यांचे छायाचित्र अनधिकृतरित्या वापरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार निवडणूक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर दैनिकातही ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर बजरंग सोनवणे यांनी १७ एप्रिल रोजी एका दैनिकात प्रसिद्ध केलेल्या बातम्यांवरून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.

दोन्ही तक्रारींवरून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी दोघांनाही नोटीसा बजावल्या आहेत. त्यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like