संत रविदास मंदीरात पोहोचल्या प्रियांका गांधी, प्रेम आणि करुणा कायम ठेवण्याचा दिला संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज संत रविदास यांचा जन्मदिन आहे. यानिमित्ताने काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्राने वाराणसीच्या गोवर्धन येथील संत रविदास यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेतले. अनेक व्हीआयपी येथे पूजेसाठी येत असून संत रविदास यांच्या मंदिरात एकच गर्दी जमली आहे. प्रियंका गांधीच्या आधी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येथे पोहोचून पूजा केली.

प्रियंका गांधीने संत रविदास यांच्या पुतळ्यास हार घालून प्रार्थना केली. यानंतर रविदास यांचे सर्वात पवित्र पुस्तक गुरु रविदास अमृतवाणीला देखील पुष्पहार अर्पण केला. यानंतर प्रियंका गांधींनी रविदासिया धर्मगुरू संत निरंजन दास महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली आणि काही काळ त्यांच्याबरोबर बसून संभाषण केले. यांनतर प्रियंका गांधीने मंदिरातून बाहेर पडत पुढे संत रविदास यांच्या वाणी संदर्भात असलेल्या सत्संगात सामील झाली.

या प्रसंगी प्रियंका गांधी म्हणाली की, संत रविदासांनी आम्हाला धर्माचा खरा अर्थ सांगितला जो सत्याच्या जवळ आहे. संत रविदासांची शिकवण आणि त्यांच्या मूल्यांवर माझा विश्वास आहे, खरा धर्म लोकांना जोडतो. संत रविदासांच्या भक्तांना संबोधित करताना प्रियंका म्हणाली की या कठीण काळात तुम्हाला लोकांची मदत करून खरोखरच या धर्माचे अनुसरण करीत आहात. राजकारणातही परस्पर आदर, प्रेम आणि करुणा कायम ठेवली पाहिजे.