राज्यात विविध ठिकाणी निषेध रॅली

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर य्यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला आज ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या हत्येमागील मास्टर मार्इंडला शोधा, अशी मागणी पुण्यात काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत करण्यात आली.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7c1d7bd-a441-11e8-ab15-d9b9b2a40274′]

याप्रकरणी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यामध्ये समावेश असलेल्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे.  मात्र अद्यापपर्यंत या हत्येमागील सूत्रधाराचा शोध लागलेला नाही.  याच्या निषेधार्थ आज पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘जवाब दो’ निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. निषेध रॅलीला सुरुवात झाली असून मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, मेधा पानसरे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी या रॅलीत सहभागी झाले आहेत.

यानंतर सकाळी ११ वाजता व्यर्थ न हो बलिदान हे चर्चासत्र होणार असून त्यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभोलकर आणि तुषार गांधी सहभागी होणार आहेत. दुपारी सव्वा बारा वाजता डॉ. दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास यापुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन होणारआहे. त्यानंतर दुपारी २ वाजता अभिव्यक्ती के खतरे या विषयावर प्रकाश राज आणि अमोल पालेकर हे विचार मांडणार आहेत.

दुसरीकडे कोल्हापुरातही ‘निर्भय बनो मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात ‘निर्भय बनो मॉर्निंग वॉक’ काढण्यात आला.

कॉ. उदय नारकर म्हणाले की, ‘या हत्येमागील मेंदू कोणाचा आहे याचा शोध लागेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. या उलट आम्ही तो अधिक तीव्र करू. दाभोलकर-पानसरे हे मानव कल्याणचा विचार मांडत होते. त्यांना मारणारे हे समस्त मानव जातीचे मारेकरी आहेत. एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात येतील म्हणून त्यांना संपविण्यात आले’.