Pune : शुल्क भरले नाही म्हणून दहावी-बारावीतील विद्यार्थी हॉलतिकीटापासून ‘वंचित’?

पुणे : राज्यातील काही शाळा-महाविद्यालयाकडून शुल्क न भरल्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉलतिकीट दिले नाही. कोणीही विद्यार्थी शुल्क भरले नाही म्हणून परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्याचे शाळा-महाविद्यालयांना आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक शेतकरी संघाच्या राज्य महिला उपाध्यक्षा राजनंदिनी गव्हाणे यांनी केली आहे.

गव्हाणे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरले नाही म्हणून हॉल तिकीट दिले नाही, ही बाब अशोभणीय आहे. हॉलतिकीट मिळाले नाही, तर विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. मागिल वर्षभरापासून कोरोनामुळे अनेकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे रोजगार नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच वर्षभर घरात बसून कसा तरी अभ्यास केला असून, आता परीक्षा देता येणार नसल्याने विद्यार्थी वा पालकांकडून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शासनाने तातडीने विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देऊन परीक्षा देण्यासाठीची व्यवस्था केली पाहिजे. कोरोनामुळे मागिल वर्षभर शाळा-महाविद्यालये बंद होती, त्यातच अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातून मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून उसनवारी करून मोबाईल घेऊन दिला आणि ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला. मात्र, आता ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळा-महाविद्यालयांकडून शुल्क भरले नाही म्हणून हॉलतिकीट दिले गेले नाही. त्यामुळे आमची मुले परीक्षेला बसता येणार नसल्याने कोरोनाबरोबर पुन्हा दुसरे संकट आमच्यासमोर राहिले आहे. आमचा रोजगार सुरू झाला की, शाळा-महाविद्यालयाचे शुल्क भरू, अशी भावनाही अनेक पालकांनी बोलून दाखविल्याचे त्यांनी सांगितले.