Pune : कंपनीतील 22 वर्षीय तरूणीचा विनयभंग; HR सह दोघांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीत काम करणाऱ्या तरुणींचीच येथील एच. आर. मॅनेजर आणि त्याच्या दोन साथीदारांनी छेड-छाड काढत त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर तरुणींनी विरोध केल्यानंतर ‘माझ्याकडे बंदूक आहे, तुला संपवायला वेळ लागणार नाही’ अशी धमकी दिली आहे.

माजीद जावेद शेख (वय 40), कॉन्ट्रॅक्टर अमित जाधव व कंपनीचा एच. आर सतीश पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 22 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी व तिच्या तीन मैत्रिणी केसनंद फाटा एमआयडीसीतील एका प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करतात. आरोपी पाटील हा येथे एच. आर. आहे. त्यांनी संगणमत करून फिर्यादी व तिच्या मैत्रिणीकडे वाईट नजरेने पाहून त्यांच्या अंगाशी लगट केली. फिर्यादीने त्याला विरोध केला. माझ्याकडे बंदूक आहे तुला संपवायला वेळ लागणार नाही, अशी धमकी दिली. तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.