Pune : पौड रस्त्यावरील दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी अन् त्यातील 7 लाखांची रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कायम वर्दळ असणार्या पौड रस्त्यावर दुकानासमोर पार्क केलेल्या दुचाकी व त्यात असलेली 7 लाखांची रोकड चोरट्यांनी पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे.

याप्रकरणी अमोल परदेशी (वय ४४, रा. नाना पेठ) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पौड रस्त्यावरील आनंदनगर येथे अमोल सी फुड्स नावाचे मासे विक्रीचे दुकान आहे. शनिवारी सकाळी त्यांना एका व्यक्तीला पैसे द्यायचे होते. त्यामुळे ते रोकड घेऊन दुकानात आले होते. त्यांनी आणलेली रोकड मोपोडच्या डिक्कीत ठेवली व दुचाकी दुकानासमोर लावली. आणि काही वेळासाठी ते दुकानात गेले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची दुचाकीच चोरून नेली. फिर्यादी हे काही वेळाने बाहेर आले. त्यावेळी त्यांना त्यांची दुचाकी दिसली नाही. त्यात 7 लाखांची रोकड असल्यामुळे ती देखील चोरीला गेली. त्यामुळे फिर्यादी यांनी शोध करत तत्काळ कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक आर. ए. यादव हे हे करत आहेत.