Pune : रेमडेसिवीर इंजेक्शन चढया दराने विकण्याचा प्रयत्न; मेडिकल दुकानदाराला अटक

पुणे : वडिलांसाठी घेतलेल्या ४ पैकी एक रेमडेसिवीर इंजेक्शन शिल्लक राहिल्याने ते परत आणून दिले. हे इंजेक्शन काळ्या बाजारात ४५ हजार रुपयांना विकणार्‍या मेडिकल दुकानदाराला गुन्हे शाखेने अटक केली.

देवेंद्र काळुराम चौधरी (वय २५, रा. चिरके कॉलनी, लोहगाव ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमकार भरत पवार (रा. लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी औषध निरीक्षक श्रृतिका जाधव यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ओमकार पवार यांचे वडिल कोरोनामुळे आजारी होते. त्यांच्या उपाचारासाठी डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पवार यांनी ४ रेमडेसिविर इंजेक्शन प्रत्येकी १३०० रुपये प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून विकत घेतली होती. त्यापैकी १ इंजेक्शन शिल्लक राहिले होते. त्यांनी ते देवेंद्र चौधरी याला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी दिले.

चौधरी याचे लोहगाव येथे शिव मेडिकल या नावाने दुकान आहे. चौधरी याने हे इंजेक्शन एकाला ४५ हजार रुपयांना बेकायदेशीररित्या विकले. त्याची कोणतीही पावती करण्यात आली नाही. याबाबतची तक्रार मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ४ने देवेंद्र चौधरी याला अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे करीत आहेत.