Pune-Baramati-Shirur-Maval Lok Sabha | बारमती मतदारसंघात 7 मे तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 13 मे रोजी होणार मतदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune-Baramati-Shirur-Maval Lok Sabha | पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघामध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यापैकी बारामती मतदारसंघामध्ये ७ मे रोजी मतदान होत असून पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघामध्ये एक आठवड्याने अर्थात १३ मे रोजी मतदान संपन्न होणार आहे. या चारही मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) थेट लढत होणार असून उमेदवारांना प्रचारासाठी मोठा कालावधी मिळणार आहे.

बारामती मतदार संघामध्ये १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज उपलब्ध होणार असून १९ एप्रिलला अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. २० एप्रिलला अर्जांची छाननी होईल तर २२ एप्रिलला अर्ज माघारीची अंतिम तारीख असेल. ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या (Sharad Pawar NCP) विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांची उमेदवारी निश्‍चित असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांचीही उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली असून त्या देखिल प्रचाराला लागल्या आहेत. त्यामुळे मतदानापर्यंत जवळपास पावणेदोन महिने प्रचारासाठी वेळ मिळणार आहे.

पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघांसाठी १३ मेला एकाच दिवशी मतदान होणार आहे. या तीन्ही मतदारसंघामध्ये १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. २५ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. २६ एप्रिलला अर्जांची छाननी होईल तर २९ एप्रिल ही अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. या तीनही मतदार संघामध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे.

महायुतीकडून भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे. मात्र, महाविकास आघाडीची अद्याप जागा वाटपाची चर्चा सुरू असली तरी पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील, हे जवळपास निश्‍चित आहे. काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी आमदार मोहन जोशी (Congress Mohan Joshi), शहरअध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) आणि माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) यांच्यासह अन्य इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून येत्या दोन तीन दिवसांत उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

शिरूरमध्ये महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांची उमेदवारी निश्‍चित आहे. डॉ. कोल्हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. तर महायुतीमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघाची मागणी केली असून अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र अजित पवार यांच्याकडे उमेदवाराची वानवा असल्याचे तुर्तास तरी दिसते. पुर्वी सलग तीन वेळा येथून शिवसेनेकडून विजयी झालेले शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असेल? हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.

मावळ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे – Shivsena UBT) संजोग वाघीरे (Sanjog Waghere) यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने या मतदारसंघावर दावा सांगितला असून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनाच उमेदवारी मिळेल, अशी शक्यता आहे. परंतू महायुतीतील घटक पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांच्या पाठोपाठ भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने महायुतीच्या उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक