Pune : बिले सादर केली परंतू काम अद्याप सुरूच ! भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाकडील ‘त्या’ कामांची बिले थांबविण्याचे आदेश; महापालिका आयुक्तांच्या ‘दक्षता पथकाचा’ इफेक्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महापालिकेचे आर्थिक वर्ष संपत असताना मार्च अखेरीस देण्यात आलेल्या वर्क ऑर्डरनुसार २५ मार्चनंतरही काम सुरू असेल, तर त्या कामांची बिले थांबविण्याचे आदेश झोन क्रं. ५ चे उपायुक्त अविनाश संकपाळ यांनी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाला दिले आहेत.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मागील आर्थिक वर्षात काढण्यात आलेल्या निविदांच्या वर्क ऑर्डर १९ मार्चपर्यंत तर बिले २५ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच या कालावधीत होणार्‍या विकासकामांचा दर्जा आणि सर्वप्रकारची कायदेशीर पुर्तता होते की नाही, याचे ऑडीट करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने केलेल्या पाहाणीमध्ये थर्ड पार्टी ऑडीटमधील त्रुटींसह अनेक ठिकाणी कामे पुर्ण होण्याच्या अगोदरच बिले सादर झाल्याचे निष्पण्ण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी कामांची तपासणी न करताच अभियंते आणि त्यावरील वरिष्ठ अधिकार्‍यांनी बिले मंजूर केल्याचे समोर आले होते. या अहवालावरून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी एक झोनल उपायुक्त, दोन क्षेत्रिय अधिकारी, तीन कार्यकारी अभियंते आणि ११ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबधित अधिकारी आणि अभियंत्यांकडून १५ दिवसांत खुलासा मागविला आहे.

महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी आणि कामांचा सुमार दर्जा यातून मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुरू झाल्याचा आरोप शिवसेना आणि कॉंग्रेसने केला असून संबधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाकडूनही काही कामे पुर्ण व्हायच्या आधीच बिले सादर केल्याचे समोर आले आहे. बिले सादर करताना ‘सा’ क्रमांक नमूदच केला नसल्याचे लक्षात आल्याने प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत झोन क्र.५ चे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी २५ तारखेला ज्या कामांची बिले सादर झाली आहेत, परंतू अद्याप काम सुरू आहे अशा कामांची बिले थांबविण्याचे आदेश भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाला दिले आहेत. अविनाश सकपाळ यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.