Pune : पुण्यात Remdesivir Injection चा काळाबाजार तेजीत? पोलिसांची तिसर्‍यांदा कठोर कारवाई ! स्वतःला औषध विक्रेते सांगणार्‍या 5 जणांना अटक तर 4 डोस जप्त, चंदननगर आणि लोणीकंदमध्ये FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात एकीकडे केवळ रेमिडेसीविर इंजेक्शन न मिळाल्याने हाल होत असताना पुणे पोलिसांनी तिसऱ्यांदा कारवाई करत तबल 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभारही दिसून येत आहे. दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

मोहंमद महिरुख पठाण (वय 28), परवेज मैनुद्दीन शेख (वय 36), इम्तियाज युसूफ अजमेरी (वय 52), अश्विन विजय सोळखी (वय 41) यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात आणि रोहिदास बनाजी गोरे (वय 47) याच्यावर लोणीकंद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना अटक केली आहे. याबाबत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातही रुग्णांना हॉस्पिटल अन बेड मिळत नाहीत. तर ऑक्सिजन आणि आवश्यक असणारे रेमिडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाला आहे. हा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. पुणे पोलिसांनी 10 पथके खास यासाठी तयार केली आहेत. पण त्याचा काळा बाजार सुरूच असल्याचे दिसत आहे.

दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी हॉस्पिटल आणि मेडिकल संबंधित व्यक्तींनाच या इंजेक्शनचा काळा बाजार करताना पकडले आहे. आता देखील पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या दोन कारवायांमध्ये 5 जणांना अटक केली आहे. पुणे नगर रस्त्यावर चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पठाण, शेख, अजमेरी आणि सोलकी या चौघांना पोलिसांनी आर्थिक फायद्यासाठी दोन इंजेक्शन विक्री करत असताना पकडले आहे. ते औषध विक्रेते असल्याचे सांगत होते. तर, गोरे याला केसनंद फाटा परिसरात पकडले आहे. त्याच्याकडून देखील 2 इंजेक्शन जप्त केले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या काळा बाजार प्रकरणात स्वतः लक्ष घालत त्याला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे काही प्रमाणात याला लगाम लावला जात असल्याचे दिसत आहे. पुणे पोलिसांची ही तिसरी मोठी कारवाई झाली आहे. नागरिकांनी देखील असे काही संशयास्पद दिसून आल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.