बांधकाम व्यावसायिक DSK यांच्या 6 अलिशान गाड्यांचा लिलाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम व्यावसायिक दीपक सखराम कुलकर्णी अर्थात डीएसके हे ठेवीदारांना फसवल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. डीएसके तुरुंगात असल्याने ठेवीदारांचे पैसे आणि बँकांची देणी परत करता यावीत यासाठी डीएसकेंच्या अलिशान गाड्यांचा लिलाव आज करण्यात आला. डीएसके यांच्या 9 पैकी 6 गाड्यांचा लिलाव यावेळी करण्यात आला. लिलावामध्ये डीएसके यांच्या इनोव्हा या गाडीला सर्वाधिक किंमत मिळाली.

मावळ प्रांत संदेश शिर्के यांच्या देखरेखेखाली झालेल्या लिलावामध्ये वाहनांचा लिलाव करण्यात आला. या लिलावतून 9 लाख 30 हजार रुपये मिळाले आहेत. आज झालेल्या वाहनांच्या लिलावामध्ये सर्वात कमी किंमत टोयाटो कंपनीच्या क्वालिस या चारचाकी वाहनाला मिळाली. तिची 3 लाख 5 हजार रुपयांना विक्री झाली. या लिलावाच्या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.आय. शेख आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार उपस्थित होते.

लिलावाच्या पहिल्या प्रक्रीयेला सुरुवात झाल्यानंतर काही वेळात पाच वाहनांचा लिलाव झाला. आज डीएसके यांच्या 9 वाहनांपैकी 6 वाहनांचा लिलाव करण्यात आला. सुरुवातीला पाच वाहनांची विक्री झाली. त्यामुळे विक्री न झालेल्या वाहनांची खरेदी करता यावी म्हणून वाहन घेण्यासाठी आलेल्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. यात टोयोटा कंपनीच्या क्वालिस गाडीचा लिलाव झाला. 26 लाख 64 हजार रुपये किंमत असलेल्या ऑगस्टा कंपनीची दुचाकी देखील लिलावामध्ये ठेवली होती. मात्र, या दुचाकीवर कोणीही बोली लावली नाही.

विक्री झालेले वाहने     मिळालेली किंमत         खरेदीदार
टोयोटा क्वालिस –        3,05000              शुफियान शेख
टोयोटा इनोव्हा –          8,50000              बालाजी मोटर्स
टोयोटा इनोव्हा –          6,05000              विनोद डोंगरे
टोयोटा इनोव्हा –          9,30000               संपत पाटील
टोयोटा इनोव्हा –          7,75000               बालाजी मोटर्स
टोयोटा इनोव्हा –          4,80000               शुफियान शेख

लिलाव न झालेली वाहने आणि किंमत
ऑगस्टा एफ – 4, 26, 64,559
हुंदाई सॅन्ट्रो – 1, 20000
टोयोटा इटिओस – 4,30000