Pune : दिलासादायक ! पुणेकरांना मिळणार 3 ऑक्सिजन प्लांटमधून ‘प्राणवायू’; महापालिका आणखी 7 Oxygen Plants उभे करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने खासगी संस्था, कंपन्या, बँका आदींच्या मदतीने ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 3 प्लांट उभे केले असून यातून 3 हजार लिटर प्रति मिनिट अशी ऑक्सिजन निर्मिती होत आहे.

शहरात एकूणच रुग्णसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे परराज्यातून आयात करण्यास सुरुवात झाली. मात्र तो देखील अपुरा पडू लागला. त्यामुळे महापालिकेला स्वतःच्या रुग्णालयात तरी ऑक्सिजन प्लांट असावेत अशी आवश्यकता भासू लागली. त्यामुळे काही संस्थांच्या मदतीने हे प्लान्ट उभारण्यात येत आहे. यासाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारला आहे. तर काही ठिकाणी पालिकेने खर्च केला. पालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखाना, दळवी रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि बाणेर जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात प्लान्ट उभारले आहेत. यात लायगुडे, दळवी आणि नायडूमधील प्लान्ट सुरू झाले आहेत. तर, बाणेर येथील प्लांटचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच खेडेकर, बाणेर, वारजे, नायडू आणि इंदिरानगर येथील रुग्णालयांत 6 प्रकल्प प्रस्तावित आहेत.

ऑक्सिजन निर्मिती सुरू झालेले प्रकल्प

रुग्णालय क्षमता (लिटर प्रति मिनिट) खर्च
मुरलीधर लायगुडे- 300 50 लाख
दळवी रुग्णालय- 1700 2 कोटी 10लाख
नायडू रुग्णालय- 850 1 कोटी 50 लाख
बाणेर जम्बो सेंटर- 24 टन 1 कोटी 30 लाख (कामाची ऑर्डर दिली)

प्रस्तावित असलेले प्रकल्प

रुग्णालय क्षमता (लिटर प्रति मिनिट) खर्च
खेडेकर- 600 80 लाख
बाणेर – 1000 1 कोटी 50लाख
बाणेर जम्बो सेंटर- 200 3 कोटी
वारजे- 850 1 कोटी 50 लाख
नायडू- 850 1 कोटी 50 लाख
इंदिरानगर- 850 1 कोटी 50 लाख