Pune : हडपसरच्या स्टेट बँक ऑफ इंडियातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची छळवणूक ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसरमधील (मगरपट्टा चौक) स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य ग्राहकांची हेळसांड होत आहे. पासबुकमध्ये नोंद करणे, पैसे काढणे, पैसे भरणे, पेन्शनची रक्कम आली की नाही याविषयी माहिती विचारल्यानंतर ३, ५, ९ क्रमांकाच्या खिडकीवर जा असे सांगितले जाते. या तिन्ही क्रमांकाच्या ठिकाणी ग्राहकांना सेवा मिळण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागत आहे. बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी संबंधितांनी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कष्टाने कमाविलेली आपली पुंजी सुरक्षित राहावी, यासाठी खासगी बँकांमध्ये पैसे गुंतवू नका, राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे ठेवा, असे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांतील ग्राहकांप्रतीची विस्कळीत आणि अरेरीवीची सेवा असल्याने नागरिक खासगी बँकांमध्ये पैसे गुंतविणे, आर्थिक व्यवहार करण्याला प्राधान्य देत आहे. खासगी बँकांतील व्यवहारासाठी नागरिकांची पसंती का आहे, ही बाब वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी तपासणे गरजेचे आहे. सहकारी बँका आणि पतसंस्थांचा कारभार पारदर्शक होऊ पाहात आहे. त्यांची ग्राहकाभिमुख सेवा अत्यंत उल्लेखनीय आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यातील काही पतसंस्था आणि सहकारी बँका अपवाद आहेत. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकेतील ग्राहकांप्रती सेवा अत्यंत भयानक पद्धतीची आहे. राष्ट्र हितासाठी राष्ट्रीयीकृत बँकांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती बदलणे आवश्यक आहे.

किरकोळ कारणासाठी दोन दोन तास रांगेत थांबावे लागत आहे. येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मराठी भाषा येत असून, अडाणी ग्राहकासमोर हिंदी भाषेत संवाद साधतात, त्यामुळे समजत नसल्याने बँक ग्राहकाची मानहानी होत आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर त्या क्रमांकाची फक्त रिंग वाजते, कोणताही प्रतिसाद मिळत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी आहे, अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, शाखा व्यवस्थापक तोंडवळकर म्हणाल्या की, कोरोनामुळे अधिकारी-कर्मचारी वर्ग कमी आहे. सरकारनेच 15 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये काम करा असे सांगितले आहे. खरं तर बँकासुद्धा बंद ठेवल्या पाहिजेत, असे सांगून त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.