Pune : जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी लागणाऱ्या ई-पाससाठी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात संचारबंदी जारी करण्यात आली असून गेल्या शुक्रवारपासून जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक प्रवासासाठी नागरिकांना डिजिटल पासची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे ई पास देताना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक करण्यात आला आहे. हा रिपोर्ट जोडला नसेल तर ई पास नाकारण्यात येत आहे. त्यामुळे ई पास हवा असेल तर अगोदर तुमच्याकडे कोविड निगेटिव्ह रिपोर्ट अत्यावश्यक आहे.

पुणे शहर पोलिसांकडे गेल्या तीन दिवसात तब्बल ११ हजारांहून अधिक डिजिटल पाससाठी नागरिकांनी अर्ज केले होते. त्यापैकी निम्म्यांहून अधिक अर्ज नाकारण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत ११ हजार २३८ डिजिटल पासची मागणी करणारे अर्ज पुणे पोलिसांकडे दाखल झाले होते. त्यापैकी ५ हजार ९७ अर्ज नाकारण्यात आले आहेत. केवळ ३ हजार ३०२ पास मंजूर करण्यात आले असून अजून २ हजार ५०० पासांची मंजूरी प्रलंबित आहे. ३३८ अर्जांची मुदत संपली असल्याने त्यांना ई पास देण्यात आलेला नाही.

एखाद्याच्या जवळच्या नातेवाईकांचा मृत्यु किंवा गंभीर आजार असेल व तातडीने जायचे असेल तर अशा पासबाबत कोविड रिपोर्टचा अपवाद केला जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा असेल तर अगोदर कोविड निगेटिव्ह रिपोर्ट तयार ठेवावा लागणार आहे.