Pune Crime News | ललित पाटील ससूनमधून कसं चालवत होता ड्रग्स रॅकेट, कसा गेला पळून?

ससून रुग्णालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस संशयाच्या पिंजऱ्यात; महिला पीएसआयसह 7-8 पोलिस निलंबीत?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) ड्रग्ज रॅकेटचा (Drug Racket) म्होरक्या ललित अनिल पाटील (Lalit Anil Patil) ससूनमध्ये डयुटीवर असलेल्या पोलिसांच्या (Pune Police) ताब्यातून पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपुर्वी ससून हॉस्पिटलच्या गेटवर दोन कोटींच्या मेफेड्रॉन Mephedrone (MD) या अंमली पदार्थासह ललित पाटीलच्या दोन साथिदारांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी मुख्य आरोपी ललित पाटील हा पळून गेला. अटकेतील आरोपी जर ड्रग्स रॅकेट चालवत असेल आणि ते उघडकीस येताच तो पळून जात असेल तर त्यामध्ये ससून हॉस्पिटल व्यवस्थापन, येरवडा कारगृह प्रशासन (Yerwada Jail Administration) आणि पुणे पोलिसांमधील समन्वयाचा अभाव आणि डयुटीवर असलेल्या पोलिसांचा हालगर्जीपणा ही प्रमुख कारणे आहेत. (Pune Crime News)

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांना उपचार योग्य उपचार मिळत नसताना दुसरीकडे अट्टल गुन्हेगारांना मात्र ऐशोआरामात राहता येतं. यातीलच ललित पाटील हा ड्रग्स माफिया (Drug Mafia) मागील चार महिन्यापासून वेगवेगळ्या आजारांची कारणे देत ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. तो ससून हॉस्पिटलमध्ये राहून ड्रग्स रॅकेट चालवत होता. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Squad) याचा पर्दाफाश करुन ललित पाटीलच्या दोन साथीदारांना दोन कोटींच्या अंमली पदार्थासह हॉस्पिटलच्या गेटवर अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ललित पाटील ससूनमधून पळून गेल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे ससूनचे प्रशासन येरवडा जेल प्रशासन आणि ससूनमध्ये बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ललित पाटीलचा मेफेड्रोन बनवण्यात हातखंडा

ललित पाटील हा केवळ अंमली पदार्थाची विक्री करत नव्हता तर तो मेफेड्रोनसारखा (एमडी) अंमली पदार्थ तयार करण्यात त्याचा हातखंडा होता. त्याला 2020 मध्ये चाकण येथून अंमली पदार्थाची विक्री करताना अटक करण्यात आली होती. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. मात्र, त्याने कारागृहातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन आजारी असल्याचं नाटक केलं आणि ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्याला भरती करण्यात आलं.

हॉस्पिटलमधून ड्रग्स रॅकेट चालवायचा

ससून हॉस्पिटलमधील 16 नंबर वॉर्डमध्ये कैद्यांवर उपचार केले जातात. याच वॉर्डमध्ये ललित पाटील याला ठेवण्यात आले होते. या वार्डभोवती पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा चोवीस तास पहारा असतो. पोलिसांचा खडा पहारा असताना देखील ललित पाटील याने आपले ड्रग्स रॅकेट सुरु ठेवले होते. त्यासाठी त्याने रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कामगार रौफ शेख याला हाताशी धरले. याशिवाय येरवडा कारागृहात ओळख झालेला सुभाष मंडल त्याला येऊन मिळाला. (Pune Crime News)

अंमली पदार्थाच्या व्यवहारासाठी 2 मोबाईल

पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन ससूनच्या 16 नंबर वार्ड मध्ये उपचार घेणाऱ्या ललित पाटील याच्याकडे बिनदिक्कतपणे पोहोचत होते. मेफेड्रोनच्या व्यवहारासाठी त्याच्याकडे मोबाईल फोन देखील उपलब्ध होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकला याची कुणकुण लागताच त्यांनी सापळा रचला. साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्याने सुभाष मंडल यांची पुणे स्टेशन (Pune Railway Station) परिसरात भेट घेऊन मेफेड्रोन पाहिजे असल्याचे सांगितले.

ललित पाटीलला दाखवल्या नोटा

यानंतर सुभाष मंडल याने ससून रुग्णालयातील ललित पाटील याला व्हिडिओ कॉल केला आणि ग्राहक बनून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्याकडील नोटा ललित पाटील याला दाखवल्या. त्यानंतर पाटील याने दोघांना ससून रुग्णालयात बोलावून घेतले. 16 नंबर वॉर्डच्या खिडकीतून ललित पाटील याने मेफेड्रोन असलेली बॅग खाली टाकली. ही बॅग रौफ शेख आणि सुभाष मंडल याने उचलली. ते दोघे ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर आले. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी दोघांवर छापा टाकून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला. परंतु ललित पाटील हा रुग्णालयात उपचार घेत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी अर्ज केला. मात्र दुसऱ्याच दिवशी ललित पाटील याचं ऑपरेशन करावं लागणार असल्याचे, ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं.

एक्स-रे साठी नेत असताना गेला पळून

सोमवारी संध्याकाळी ललित पाटील याला एक्स-रे काढण्यासाठी रुग्णालयातील एक्स-रे मशीन ज्या ठिकाणी आहे तिथे नेले जात होते. त्यावेळी त्याने पोलिसांना धक्का देऊन पळून गेला, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. परंतु ललित पाटील पळून गेला की पळवून लावला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण ललित पाटीलच्या चौकशीतून त्याला साथ देणाऱ्या ससून रुग्णालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची आणि पुणे पोलीस दलातील अनेक पोलिसांची नावे उघड होण्याची शक्यता होती. त्याच्याकडून जप्त केलेल्या दोन मोबाईलचे पासवर्ड विसल्याचं तो पोलिसांना सांगत असल्याने त्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता आहे.

ललित पाटीलला भावाची साथ

ललित पाटील हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून त्याला त्याचा भाऊ भूषण पाटील याची साथ असल्याचे उघड झाले आहे. ललित पाटील याच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथकं रवाना करण्यात आली आहेत. सध्या तरी पुणे पोलिसांकडे याबाबत काहीही सांगण्यासारखे नाही. एरवी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करायचा असेल तर सर्वसामान्यांची तपासणी करुन त्यांना आतमध्ये सोडले जाते. याठिकाणी योग्य उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र अट्टल गुन्हेगारांना याठिकाणी हवं ते सगळं कसे मिळते? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

आजारी असताना पळून कसा गेला?

ललित पाटील याच्यावर वेगवेगळ्या आजारांवर उपचार केल्याच्या नोंदी आहेत. त्याला कधी टी बी झाला, कधी पोटात अल्सर तर कधी त्याचं हार्नियाचं ऑपरेशन करण्याची गरज असल्याचा अहवाल ससूनच्या डॉक्टरांनी दिला आहे. एकाच व्यक्तीला एकाचवेळी एवढे आजार कसे काय होऊ शकता आणि एवढा आजारी असणारा व्यक्ती पोलिसांच्या तावडीतून कसा काय पळून जाऊ शकतो, असा निरागस प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. या सर्व घटनांबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर मात्र मौन बाळगून आहेत.

कोर्ट कंपनीचे म्हणजेच ससूनमध्ये डयुटीवर असलेले पोलीस संशयाच्या पिंजऱ्यात

या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील आहे. परंतु ससूनचं व्यवस्थापन, येरवडा कारागृह प्रशासन आणि ससूनमध्ये
डयुटीवर असलेले पोलीस यांना त्याने संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ललित पाटील पकडला जाईल,
पण त्याला साथ देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नाव समोर येतील का? ससून हॉस्पिटलमधून चालवला जाणारा
काळा बाजार संपणार का? पोलीस आणि रुग्णालयातील डॉक्टरच एका ड्रग्स माफियाला मदत करत असतील तर
अपेक्षा ठेवायची तरी कोणाकडून? हा प्रश्न कायम राहतो.

महिला पीएसआयसह 7-8 पोलिस निलंबीत

ससून रूग्णालयात बंदोबस्तासाठी आणि खास करून वॉर्ड नंबर 16 मध्ये उपचार घेणार्‍या बंद्यांवर वॉच ठेवण्यासाठी
पोलिस मुख्यालयाकडील कोर्ट कंपनीचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येतात.
सोमवारी सायंकाळी देखील वॉर्ड क्रमांक 16 च्या आवती-भवती आणि ससूनमध्ये कोर्ट कंपनीचे अधिकारी आणि
पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर करून कामामध्ये हालगर्जीपणा केल्यामुळे एका
महिला पोलिस उपनिरीक्षकासह 7-8 पोलिसांना निलंबीत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस दलातील सुत्रांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | वानवडी परिसरात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 46 वी स्थानबध्दतेची कारवाई