आरक्षणासाठी धनगर समाजाचा आजपासून एल्गार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले आहे असे असताना आता धनगर समाजाने देखील अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीकरीता तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुण्यात याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली .

यावेळी बोलताना धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे म्हणाले , ” सरकारची धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याची मानसिकता नसल्यामुळे मागील चार वर्षाच्या काळातील कारभारातून दिसत आहे. त्यामुळे आता धनगर समाजाने तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आजपासूनच सुरवात होणार असल्याचे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B06X41T82Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’adbcbdee-94b1-11e8-8296-657bfd2f6651′]

सरकारला धरले धारेवर

राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी लेखी पत्राद्वारे दिले होते. मात्र, आज चार वर्षांचा काळ लोटला. त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर धनगर समाजाला दिलेले आश्वासन विसरले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यावर त्यांनी निशाणा साधला. तसेच या लढ्यादरम्यान कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यासह कोणत्याही मंत्र्याने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत साधा ‘ध’ देखील उच्चारलेला नाही, याची खंत वाटते. त्यामुळे आता धनगर समाजाने या सरकारविरोधात तीव्र लढा उभारण्याचा पवित्रा घेतला आहे. आजपर्यंत आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या पत्रकार परिषदेला धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे, आमदार रामहरी रूपनवर, राम वडकुते, दत्ता भरणे, पुणे जिल्हापरिषद अध्यक्ष विश्वास देवकते यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर त्यांनी आपली भुमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली.