संयमाने वागू आणि कोरोनाला हरवूचा संदेश देत उपनगरात उभारली गुढी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मागिल वर्षभरापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. आज कोरोनाचे संकट गडद होत असल्याने संयमाने वागू आणि कोरोना हरवू, असा संदेश देत उपनगर आणि परिसरात गुढी उभारून नागरिकांना आप्तस्वकीयांबरोबर गुढी उभारली. गुढी संयमाची.. संघर्षाची… संकल्पाची… सातत्याची… सहकार्याची… सौजन्याची… या कोरोना संकटाशी संयमाने संघर्ष करण्याचा संकल्प करू… पुढील काही दिवस सरकारी सूचनांचे सातत्याने पालन करण्याचे सौजन्य दाखवू…. असा संदेश देत आज उपनगर आणि परिसरात गुढी उभारून आनंद साजरा करण्यात आला.

विकेंडच्या लॉकडाऊननंतर गुढी पा़डव्यानिमित्तच्या खरेदीसाठी सोमवारी नागरिक घराबाहेर पडले होते. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांना गुढी उभारण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी साखरेची गाठी मिळाली नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. भल्या सकाळी बंगलो, बैठ्या चाळींमधील महिलावर्गाने ओटा धुवून, तर सोसायट्यांमधील महिलांनी दारासमोर स्वच्छता करीत रांगोळी काढून साडीचोळी, गुढी, कडूनिंबाचा डहाळा, हार आणि त्यावर तांब्या अशी साग्रसंगीत गुढी उभारली. कडूनिंबाच्या मोहर आणि साखर एकत्र करून प्रसाद देत गुढी पाडव्याचा आनंद लुटला.

लॉकडाऊनमुळे रस्त्यावर तुरळक गर्दी होती. दुकानदारांनी घरी गुढी उभारल्यानंतर दुकानासमोरही गुढी उभारली. रिक्षा आणि बसलाही काहींनी गुढी उभारल्याचे चित्र उपनगरामध्ये दिसून आले. मात्र, लॉकडाऊन पडणार या भीतीने आज गुढी पाडवा सण साजरा करून उद्या गावाकडे जाण्याची कामगारवर्गाने तयारी केली आहे. मागिल दोन महिन्यांपासून रोजगार नाही, त्यामुळे शिल्लक होती ती पुंजी संपली आहे. आता रोजगार मिळत नाही. लॉकडाऊन झाल्यानंतर काय खायचे असा प्रश्न पडल्याचे हडपसरमधील वडापाव, चहाटपरी, नीराविक्री केंद्रावरील मजुरांनी सांगितले. मजूर अड्ड्यावर मागिल चार दिवसांपासून एकही कामगार फिरकला नाही.

हडपसरच्या मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्गांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. होळीपासून कोरोनाचे संकट वाढत असल्याने प्रत्येकजण तणावाखाली आहे. होळी-गुढी पाडव्याला ग्राहकांकडून मोठी खरेदी होईल, या आशेने दुकानांमध्ये भरपूर माल भरून ठेवला होता. मात्र, कोरोनाच्या भीतीने ग्राहक खरेदीसाठी फिरकलेच नाहीत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. स्वीट होममध्येसुद्धा आज दरवर्षीपेक्षा अवघे 15 टक्के ग्राहक फिरकले. त्यामुळे यावर्षी सर्व व्यावसायिकांमध्ये नाराजी असल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले.