पुण्यातील भारती विद्यापीठ आणि दत्तवाडी परिसरात घरफोडी, 10 लाखाचा ऐवज लंपस

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून, दोन घरफोड्यात चोरट्यांनी 10 लाखांचा माल पळविला आहे. तर पार्किंगमधून कार देखील या चोरट्यांनी पळविली आहे. या घटना काही केल्या पोलिसांना रोखता येत नसल्याचे दिसत असून चोरटे त्यांची कामगिरी चोक पार पाडत आहेत. भारती विद्यापीठ व दत्तवाडी परिसरात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सतीश कमलेकर (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातचोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सतीश हे आंबेगाव बुद्रुक येथे जांभुळवाडी रोडवरील जाई अपार्टमेंट येथे दुसऱ्या मजल्यावर राहतात. शुक्रवारी रात्री ते कामानिमित्त घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील दागिने व रोकड घेतले. त्यानंतर कारची चावी घेऊन पार्किंग येथे लावलेली कार घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी कार आणि दागिने असा एकूण 4 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कोते हे करत आहेत.

तर दुसरी घटना दत्तवाडी भागात घडली असून, चोरट्यांनी येथून 6 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आशुतोष गांधी (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

गांधी हे सदाशिव पेठेतील विजयानगर येथील दिनार अपार्टमेंट येथे राहतात. शुक्रवारी रात्री ते घराला कुलूप लावून गेल्यानंतर चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच बेडरूममधील रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 6 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक धुमोळ हे करत आहेत.

शहरात गेल्या काही दिवसात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. सर्व सामान्य नागरिकांनी जमा केलेल्या पुंजीवर चोरटे काही क्षणात डल्ला मारत ते पळवत आहेत. पोलिसांना देखील या चोरट्यांना म्हणावा तसा ब्रेक लावता आलेला नाही.