Pune : अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर बेकायदेशीररित्या आंदोलन; आझाद समाज पार्टीच्या 10 जणांना 3 दिवसांची पोलिस कोठडी

पुणे: शासकीय नोकरीतील एससी व एनटीचे पदोन्नतीचे आरक्षण रद्द केल्याच्या गैरसमजातून कोणतीही परवानगी न घेता आंदोलन करीत पोलिसांशी झटापट करणा-या आझाद समाज पार्टीच्या दहा जणांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

भीमराव दत्तु कांबळे (वय ३१), अभिजित मधुकर गायकवाड (वय ३२, रा. घोरपडी), रफिक रुस्तुम शेख (वय ३७, रा. लोहगाव), अंकित परशुराम गायकवाड (वय २१, रा. मार्केटयार्ड), दर्शन बाबूराव उबाळे (वय २५, रा. येरवडा), दत्ता मोहन भालशंकर (वय ३८, रा. येरवडा), विनोद लक्ष्मण वाघमारे (वय ३४, रा. घोरपडी), महेश वैजनाथ थोरात (वय २१, रा. मार्केटयार्ड), सागर वीरभद्र जवई (वय २३) आणि शरद गौतम लोखंडे (वय २३, दोघेही रा. घोरपडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. न्यायालयाने त्यांना १३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी सोमवारी (ता. १०) दुपारी बाराच्या सुमारास भोसलेनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनासाठी त्यांना पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती. तसेच आंदोलन करताना कोरोना विषयक खबरदारी घेण्यात आली नाही. तसेच आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांशी झटापट केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या वतीने ॲड. तौसिफ शेख, ॲड. दीपक गायकवाड, ॲड. क्रांती शहाने, ॲड. जयदीप डोके आणि ॲड. रवी वडमारे यांनी कामकाज पाहिले.