Pune : 82.34 कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण ! निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर व त्यांच्या भाच्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; जाणून घ्या तपासातून पुढे आलेल्या धक्कादायक बाबी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नगररचना विभागात कार्यरत असताना तेथे केलेल्या भ्रष्टाचारातून बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर आणि त्यांचा भाचा राहुल खोमणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

नाझीरकर व त्यांच्या कुटुंबीयांकडे ८२ कोटी ३४ लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या नावे आणि भागीदारी असलेल्या ३७ कंपन्या असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. तर नाझीरकर यांच्या बेनामी मालमत्ता बँकेत गहाण ठेवून त्याद्वारे या गुन्ह्यातील आरोपी खोमणे यांनी ४८ लाख रुपयांचे कर्ज काढले. त्यानंतर ती रक्कम नाझीरकर कुटुंब भागीदार असलेल्या कंपनीत गुंतवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. खोमणे याने तयार केलेल्या बनावट करारनाम्यापैकी ३५ करारनामे हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच या व्यतिरिक्त ३४६ कृषी पावत्या जप्त करावयाच्या आहेत. खोमणेच्या वैयक्तिक बँक खात्यावर ८७ लाख रुपयाचे झालेले व्यवहार, गीतांजली ब्रिडर्स कंपनीत गुंतविलेले २३ लाख इत्यादी स्वरूपात केलेली गुंतवणूक ही त्याचे उत्पन्नापेक्षा प्रचंड जास्त प्रमाणात आहे.

नाझीरकर यांनी सार-यांच्या नावे ३५ आणि स्वतः व पत्नीच्या नावाने १७ स्थावर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. सास-यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बनावट मृत्युपत्र तयार करून सर्व मालमत्ता व कंपन्या या पत्नी संगीता नाझीरकर यांच्या नावाने वर्ग केल्या आहेत. नाझीरकर यांना २४ मार्च रोजी पुणे ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महाबळेश्वर येथून अटक केली. मागील अनेक दिवसापासून नाझीरकर ते पोलिसांना गुंगारा देत होता. नाझीरकर याच्यावर पुण्यातील दत्तवाडी व अलंकार पोलिस ठाण्यात तर मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्यांना अलंकार पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

नाझीरकर आणि खोमणे यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जास विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. जामीन मिळाल्यास या प्रकरणातील साथीदारांना नाझिरकर धमकावून शकतात. कारण साक्षीदार हे नाझिरकर यांच्या कंपनीत भागीदार आहे. नाझिरकर यांनी यापूर्वी शेतमाल विक्री संदर्भात खोमणे याच्या माध्यमातून विक्रेत्यांना धमकावले आहे. जामीनावर सुटका झाल्यावर ते पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक गिरीश सोनवणे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

तपासातून पुढे आलेल्या बाबी

–  नाझीरकर कुटुंबीयांकडे ८२ कोटी ३४ लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता

–  कुटुंबीयांच्या नावे आणि भागीदारी असलेल्या ३७ कंपन्या

–  भ्रष्टाचारातून आलेल्या पैसा सास-यांच्या नावे गुंतवला

–  पैशातून स्थावर मालमत्ता आणि विविध भागीदारी संस्थांमध्ये गुंतवणूक

–  सार-यांच्या नावे ३५ आणि स्वतः व पत्नीच्या नावाने १७ स्थावर मालमत्ता

–  सास-यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बनावट मृत्युपत्र तयार केले