Pune : ‘रेमडेसिवीर’च्या काळाबाजार प्रकरणात ‘ओनेक्स’ व ‘क्रिस्टल’ हॉस्पिटलचे डॉ. सचिन पांचाळ यांना अटक, पुणे अन् पिंपरीत प्रचंड खळबळ

पिंपरी : ऑनलाइन टीम – रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून 10 लाख रुपये किंमतीची 21 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मेडिकल दुकानदाराचा समावेश होता. आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत सखोल चौकशी केली असता या टोळीचा प्रमुख एक डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले. वाकड पोलिसांनी डॉ. सचिन रघुनाथ पांचाळ याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी सचिन पांचाळ हे ओनेक्स व क्रिस्टल हॉस्पिटल चालवतात.

वाकड पोलिसांनी 9 मे रोजी केलेल्या कारवाईत कृष्णा रामराव पाटील (वय-22 रा.क्रीस्टल हॉस्पिटल, 16 नंबर बस स्टॉप, थेरगाव), निखील केशव नेहरकर (वय-19 रा. ओनेक्स हॉस्पिटल, बिजलीनगर, चिंचवड), शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय-34 रा. जय मल्हारनगर, दत्त कॉलनी, थेरगाव) यांना अटक केली. कृष्णा पाटील हा क्रीस्टल हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. निखील हा मेडीसीन डिलीव्हरी बॉयचे काम करतो. तर शशिकांत पाचाळ याचे चिंचवड येथे आयुश्री मेडिकल दुकान आहे.

रेमडिसीवीर इंजेक्शनचा होत असलेल्या काळ्याबाजाराचा तपास करत असताना ओनेक्स व क्रीस्टल हॉस्पिटल चालवणारे डॉ. सचिन पांचाळ हे मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. ओनेक्स हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या आयुश्री मेडीकल व क्रिस्टल हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या इन हाऊस गोदावरी मेडीकलच्या नावाने 21 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले होते. डॉ. पाचाळ यांनी हे इंजेक्शन भाऊ शशिकांत पांचाळ याच्या मध्यस्थीने आणि कृष्णा पाटील याच्या मार्फत काळ्याबाजारात विकण्याचा बेत आखला होता.

या गुन्ह्यात डॉ. सचिन पांचाळ यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार डॉ. पाचाळ यांना मंगळवारी (दि.11) रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. डॉ. पांचाळ यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव करीत आहेत.