Pune : विमानतळ, भारती विद्यापीठ आणि कोंढवा परिसरात घरफोडीच्या घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात सुरू असणारे घरफोड्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून, चोरट्यांनी विविध भागातील तीन बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. विमानतळ, भारती विद्यापीठ आणि कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर शिवानंद कोळी (वय 35) यांनी तक्रार दिली आहे. यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळी हे आंबेगाव बुद्रुक परिसरात राहण्यास आहेत. ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, लोखंडी पत्र्याच्या कपाटाचे लॉकर उचकटून रोख 25 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. काल हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

दुसरा प्रकार विमानतळ भागात घडला आहे. याबाबत गणेश इंगळे यांनी तक्रार दिली आहे. इंगळे हे मोझेनगर येथील एका सोसायटीत राहतात. ते देखील घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यावेळी चोरट्यानी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरूम व हॉलमधील एकूण 60 हजार रुपयांचे दागिने टीव्ही, लॅपटॉप असा ऐवज चोरून नेला. विमानतळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

तर कोंढवामधील गोकुळ नगर येथील समृद्धी ब्लॉसम विंग या सोसायटीत चोरी झाली आहे. याप्रकरणी रवींद्र संजय पिसाळ (वय 31) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रवींद्र पिसाळ हे गावी गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या सेफ्टी डोरचा-कोयंडा तोडून घरांत प्रवेश केलाझ. सोन्या चांदीचे 38 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.