९ ते १६ जानेवारी दरम्यान रंगणार यंदाचा १८ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही यंदाच्या महोत्सवाची ‘थीम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यात होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ यावर्षी ९ ते १६ जानेवारी, २०२० दरम्यान रंगणार आहे. ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही या वर्षीच्या महोत्सवाची ‘थीम’ असून या अंतर्गत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे व अभिजित रणदिवे आदी यावेळी उपस्थित होते.

पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने देखील महोत्सवा अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारे भारतातील चित्रपट साक्षरतेचा उत्सवच साजरा केला जाईल अशी माहिती देखील यावेळी डॉ. पटेल यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेल्या व दरवर्षी चित्रपट प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पहात असतात अशा या महोत्सवासाठी यावर्षी ६० देशांमधून तब्बल १९०० चित्रपट प्राप्त झाले होते. त्यांपैकी निवडक १९१ चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवा दरम्यान चित्रपट रसिकांना मिळणार आहे. चित्रपटांबरोबरच चित्रपट विषयक चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रदर्शन यांचाही समावेश दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या महोत्सवामध्ये असेल.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पुण्यात ४ ठिकाणी ८ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यामध्ये पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), आयनॉक्स, बंड गार्डन रस्ता आणि पीव्हीआर पॅव्हेलियन, सेनापती बापट रस्ता या चित्रपटगृहांचा समावेश आहे.

यावर्षीच्या ‘थीम’बद्दल बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, ‘१ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली या गोष्टीला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताचा विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न व अग्रेसर आहेच याबरोबरच याच राज्यात ख-या अर्थाने चित्रपट सृष्टी आणि या क्षेत्रातील दादासाहेब फाळके यांसारखे प्रणेते देखील जन्माला आले. इतकेच नाही तर चित्रपट सृष्टीचा विस्तार देखील याच राज्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. म्हणूनच राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन आम्ही यावर्षीच्या महोत्सवात घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महोत्सवामध्ये चित्रपटांचे अनेक विभाग असणार आहेत.

१. स्पर्धात्मक विभाग –
वर्ल्ड कॉम्पिटिशन व मराठी कॉम्पिटिशन

२. इतर विभाग –
ओपनिंग, अवॉर्डीज्, स्टुडण्ट कॉम्पिटिशन, MITSFT इंटरनॅशनल स्टुडण्ट कॉम्पिटिशन, ट्रायबल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन, ग्लोबल सिनेमा, कंट्री फोकस (आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर आणि बाफ्टा शोर्टस्), थीम सेक्शन (महाराष्ट्राचा हिरक महोत्सव), रेट्रोस्पेक्टिव्ह, इंडियन सिनेमा, कॅलिडोस्कोप आणि ट्रिब्युट आदी.

याबरोबरच यावर्षी कंट्री फोकस (देश विशेष) या विभागात ‘युनायटेड किंग्डम’ मधील  चित्रपट, लघुपट दाखविण्यात येतील. ब्रिटीश काउंसिलचे विशेष सहकार्य यासाठी लाभले आहे. यामधील ‘द बाफ्टा शॉर्ट्स २०१९’ या लघुपट मालिकेत ब्रिटीश समाजाची विविधता दर्शविणा-या कथांचा समावेश असून युकेतील उत्कृष्ट अभिनय कौशल्यांचे दर्शन या अंतर्गत प्रेक्षकांना होईल. याबरोबरच ब्रिटीश काउंसिल व ग्रीरसन ट्रस्टच्या वतीने ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी दिला जाणारा ‘ब्रिटीश डॉक्युमेंट्री पुरस्कार’ प्राप्त माहितीपट हे देखील ‘आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ या विभागात दाखविले जातील.

महोत्सवा अंतर्गत येणा-या रेट्रोस्पेक्टिव्ह ‘सिंहावलोकन’ या विभागात देशातील नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक व लेखक ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट दाखविण्यात येतील. याबरोबरच एक महान व प्रभावी चित्रपट निर्माता म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळालेले इटलीचे फेडरिको फेलिनी यांचे चित्रपट देखील महोत्सवामध्ये दाखविले जातील. सदर वर्ष हे फेडरिको फेलिनी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने याचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून ९ डिसेंबर पासून या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीस सुरुवात होईल. चित्रपट प्रेमींनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय  चित्रपट संग्रहालय, आयनॉक्स, बंड गार्डन रस्ता व पीव्हीआर पॅव्हेलियन, सेनापती बापट रस्ता या ठिकाणी २ जानेवारी, २०२० पासून सकाळी १० ते सायं ७ दरम्यान स्पॉट रजिस्ट्रेशन करता येईल.

१८ वर्षे पूर्ण असलेले विद्यार्थी, ‘फिल्म क्लब’चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांना ओळखपत्र दाखवून रु. ६०० मध्ये नोंदणी करता येईल तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी शुल्क हे रु. ८०० इतके आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like