Pune : खेड पंचायत समिती सभापतीचा खडकवासल्यातील हॉटेलमध्ये गोळीबार ! आपल्याच पक्षाच्या सदस्यांना नेले पळवून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना खडकवासला परिसरातील एका रिसॉर्टमध्ये पहाटे ५ वाजता घडली. भगवान पोखरकर यांनी हवेत गोळीबार केला आहे. तसेच त्यांनी व त्यांचा भाऊ जालिंदर पोखरकर व इतरांनी केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहे.

पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीवरुन हा वाद झाल्याची माहिती समोर येते आहे. भगवान पोखरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते. म्हणून पंचायत समितीच्या सदस्या सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून पोखरकर विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्या ठरावाच्या बाजूने येत्या ३१ तारखेला मतदान होणार होते. त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य एका खासगी रिसॉर्ट मध्ये थांबले होते. ही माहिती पोखरकर यांना मिळाली. त्यांनी पहाटे आपला भाऊ व इतर कार्यकर्त्यांना घेऊन हे रिसॉर्ट गाठले. कोयता, लोखंडी गजानी त्यांनी हॉटेलचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. रिसॉर्टमध्ये थांबलेल्या आपल्या पक्षाच्या सदस्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार केला. सांडभोर यांना पळवून नेले.

याप्रकरणात जखमी झालेल्या प्रसाद काळे यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवेली पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.