Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिवल अंतर्गत आयोजित मराठी हास्य कवी संमेलनामध्ये पुणेकरांवर आणि महिलांवर केलेल्या विनोदी रचनांनी एकच हाशा पिकला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मराठी हास्य कवी संमेलनामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी सादर केलेल्या प्रेम कविता, विनोदी कविता, सध्याच्या राजकारणाकर केलेल्या विडंबनात्मक रचना यामुळे हास्याचे फवारे उडाले तर सामाजिक परिस्थितीवर सादर केलेल्या रचनांनी उपस्थितांना अंतर्मुख करायला लावले. (Pune Kothrud Ganesh Festival 2023)

कोथरूड गणेश फेस्टिवल अंतर्गत ‘मराठी हास्य कवी संमेलन’ रविवारी रात्री कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कवी संमेलनाला हजेरी लावत संमेलनाचा आस्वाद घेतला. त्यांचा सत्कार जेष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाने यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या हस्ते सर्व कविंचा सत्कार करण्यात आला. ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मंदार जोशी व महाराष्ट्र प्रदेश युवा सेनेचे सचीव किरण साळी, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे हे यावेळी उपस्थित होते. (Pune Kothrud Ganesh Festival 2023)

या ‘मराठी हास्यकवी संमेलनात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, प्रशांत मोरे, नितीन देशमुख, नारायण पुरी, भरत दौंडकर, सारंग पांपटवार, नीलम माणगावे, वैशाली पतंगे, हर्षदा सुखटणकर आणि मृणालिनी कानिटकर यांनी सहभाग घेतला.

नितीन देशमुख यांनी सादर केलेल्या
ओढ वरवर नको, आतली पाहिजे.. माणसे आपली वाटली पाहिजे..
भरवश्याने भरवश्यावर प्रेम केले पाहिजे, एवढ्यासाठी स्वत:वर प्रेम केले पाहिजे..
तसेच
जगणाऱ्याला जीवन कळते, बघणाऱ्याला नाही
कोण हरतो, कोण जिंकतो चिंता हवी कशाला
चिंता याची बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही..
अशा रचना सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
सारंग पांपटवार या युवा कवीने सादर केलेल्या
ना कधी कशाची फारशी काळजी केली
गोष्ट एखादी करावी वाटली.. केली
आणि
मला कधीही प्रेम कुणावर करता आले नाही
म्हणू शकत मी नव्हतो ते तर, म्हणूच शकलो नाही..
या प्रेम कवितेला रसिकांनी दाद दिली.
भरत दौंडकर यांनी सादर केलेल्या
विवेकाचा फिरलाय माथा, बुद्धिवंतांना भक्त झाल्याचा भास होतोय
आश्रयाला जावं तर अहिंसेच्या अंगाला रक्ताचा वास येतोय..
नथुराम जीवंत आहे की गांधी, अंदाज येत नाही..
या रचनेला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

प्रशांत मोरे, नारायण पुरी, नीलम माणगावे, वैशाली पतंगे, हर्षदा सुखटणकर आणि मृणालिनी कानिटकर यांनी सादर केलेल्या कवितांनाही रसिकांनी दाद दिली. जेष्ठ कवी अशोक नायगवकर यांनी त्यांच्या नेहेमीच्या शैलीत सादर केलेल्या पुणेकरांवर आणि महिलांवर केलेल्या विनोदी रचनांनी संमेलनाचा समारोप झाला.

कवी संमेलनाचे सूत्रसंचालन जेष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाने यांनी केले.

महाराष्ट्राच्या साहित्याचा सत्कार करता आला हे माझे भाग्य- उदय सामंत यावेळी बोलताना सामंत म्हणाले, मला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यायला जमले नाही, ते एका अर्थाने बारे झाले. कारण महाराष्ट्राच्या साहित्याचा सत्कार करण्याची संधी मला मिळली नसती. माझ्या हातून महाराष्ट्राच्या साहित्याचा सत्कार करता आला हे माझे भाग्य समजतो. जेष्ठ कवी अशोक नायगावकर यांचा संदर्भ देत ते म्हणाले, ज्यांचा सत्कार मी केला ते महाराष्ट्राचे धन आहे.

राजकारण्यांचेदेखील असेच संमेलन व्हायला पाहिजे असे सांगून त्यासाठी राजकीय व्यासपीठ तयार करावं अस आवाहन त्यांनी केले. 2015 मध्ये मंत्री झालो तेव्हा माझ्याकडे 11 खाती होती. त्यामध्ये माझ्याकडे नगरविकास खाते हे महत्वाचे खाते होते. बाकी सर्व खाती सोडून माझा उल्लेख नगरविकासमंत्री म्हणून केला जायचा. पण मी त्यावेळी आवर्जून सांगितले होते की मी 11 खात्यांचा मंत्री आहे त्यातील दोन खात्यांचा उल्लेख केला तर मला बारे वाटेल. मराठी भाषेचा मंत्री आणि माजी सैनिकांचे कल्याणखाते माझ्याकडे होते. मंत्री झाल्यानंतर पहिली बैठक मी सर्व जेष्ठ साहित्यिकांना बोलावूनमाझ्या दालनात घेतली होती. त्याला कारण माझ्या कार्याची सुरुवात ही साहित्यिकांनी करावी ही माझी त्यामागील भावना होती. त्यावर्षी 10 वर्षे थांबलेले वाडमय पुरस्कार आम्ही देऊ शकलो. त्यानंतर हे पुरस्कार दिलेले नाहीत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते लवकरच देण्यात येतील असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचा महोत्सव रत्नागिरीमध्येही आयोजित करावा त्यासाठी सर्व सहकार्य आपण करू असे आश्वासन त्यांनी दिले.

रामदास फुटाणे म्हणाले, उदय सामंत हे मंत्री वगैरे सर्व नंतर आहे. मराठी साहित्यावर, मराठी भाषेवर प्रेम करणारा एक व्यक्ति आपल्याला लाभला आहे, हा योगायोग आहे.

कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे स्वागत अध्यक्ष महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील असून पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर, ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मंदार जोशी व महाराष्ट्र प्रदेश युवा सेनेचे सचीव किरण साळी हे आयोजक आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kothrud Ganesh Festival 2023 | ‘किसी की मुस्कुराहटो पे हो निसार’ ! अमृता फडणवीस यांनी जिंकली कोथरूडकरांची मनं….

Shivsena MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे-ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, तरीही तारीख ठरेना