Pune : हडपसर परिसरात दहशत निर्माण करणार्‍या शेख टोळीवर ‘मोक्का’; 9 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  दहशत माजविणाऱ्या टोळक्यावर पोलीस आयुक्त कडक कारवाई करत त्यांना जेलची हवा खाण्यास पाठवत असून, आयुक्तांनी हडपसर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या शेख टोळीवर मोक्काची कारवाई केली आहे. त्यामुळे हडपसर वासीयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

अस्लम पोपट शेख (वय २३, रा. तिरंगा चौक, देवाची उरुळी), स्वप्नील उर्फ ऋषभ महेंद्र हिवाळे (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर), शुभम हरिवंश तिवारी (वय १९ रा. ससाणेनगर), अनिकेत राजू वायदंडे (वय२२ रा.साईविहार कॉलनी, काळेपडळ) ओंकार गोरख वाघमारे (वय २०, रा. काळेपडळ),सौरभ लिंबराज घोडके (वय १९, रा. उरुळीदेवाची), आमीर उर्फ तिवारी अस्मद शेख (वय २३, रा. सय्यदनगर, वानवडी), अर्शद शरीफ पटेल (वय १९, रा. उरुळीदेवाची), अविनाश उर्फ अवि भाऊराव पाटील (वय २३, रा. काळेपडळ, हडपसर) अशी मोक्काची कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. या सर्वांना अटक केली आहे. तर त्यांचे तीन साथीदार पसार झाले आहेत.

आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. तर शेख हा टोळी प्रमुख आहे. त्याने साथीदार गोळा करत त्यांची टोळी तयार केली. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात या सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी आर्थिक फायदयसाठी टोळी तयार करून गुन्हे केले आहेत. तसेच टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी (दि. १३ फेब्रुवारी) फुरसुंगी राहुल घडई (वय २३, रा. काळेपडळ) याच्यावर गाडी पार्क करण्याच्या झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून कोयत्याने वार करून व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना कोणालाही त्याच्या मदतीला येऊ दिले नाही. तसेच त्याच्या तोंडावर दगड मारून तेथील परिसरात दहशत निर्माण केली होती. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्यावर मोक्काची कारवाई करावी असा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्याची छाननी केल्यानंतर पाटील यांनी हा प्रस्ताव कारवाईसाठी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार या प्रस्तावास मंजुरी देत या टोळीवर मोक्काची कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्तांची मोक्काची ही 26 वी कारवाई ठरली आहे. तर या वर्षातील 20 वी कारवाई आहे. पोलीस आयुक्तांच्या मोक्का कारवाईने गुन्हेगाराची रवानगी जेलमध्ये होत असून, त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होत आहे.तर नागरिक मोकळा श्वास घेत आहेत.