Pune : स्वत:च्या मालकीच्या जागांवर महापालिका लावणार जाहिरातींचे होर्डिंग्ज, उत्पन्नवाढीसाठी महापालिका प्रशासनाचे पाउल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेेने आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. महापालिकेच्या मिळकतींवर जाहिरातींचे होर्डींग्न उभारून त्याद्वारे उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरातील महापालिकेच्या मिळकती आणि जाहिरातींसाठी योग्य जागांचा सर्व्हे आणि अभ्यास करण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.

शहरामध्ये विविध ठिकाणी महापालिकेच्या प्रशासकिय इमारती, नाट्यगृह, क्रिडा संकुले, बहुद्देशीय भवन, सांस्कृतिक केंद्र, शाळांच्या इमारती अशा अनेक वास्तु आहेत. तसेच उद्याने, क्रिडांगणे आणि मोक्याच्या रस्त्यांवरील जागा ताब्यात आहेत. याठिकाणी महापालिकेच्या वतीने जाहिरातींचे होर्डींग्ज उभारून उत्पन्न मिळु शकणार आहे. महापालिकेच्या मिळकतींची संख्या मोठी असली तरी नेमके कोणत्या मिळकतींच्या ठिकाणी जाहिरातींना चांगला प्रतिसाद मिळू शकेल यासाठी सर्वेक्षण आणि अभ्यास होणे गरजेचे आहे. महापालिकेकडील कर्मचारी संख्या आणि सद्यस्थिती पाहाता त्यांच्याकडून हे सर्वेक्षण होणे वेळखाउ आहे. तसेच व्यावसायीकदृष्टया मुल्यमापनही किचकट आहे. यामुळे महापालिकेने सर्वेक्षण व अभ्यासासाठी व्यावसायीक संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत.

यासंदर्भात माहिती देताना आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपायुक्त संजय गावडे यांनी सांगितले, की महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या जागांवर जाहिरातींचे होर्डींग्ज उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. व्यावसायीक संस्थांकडून २५ ऑक्टोबरपर्यंत पर्याय मागविण्यात आले आहेत. यासंदर्भातील प्रिबीड मिटींग ८ ऑक्टोबरला होणार आहे. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल.