Pune News : स्वच्छ संस्थेच्या सेवेला 110 नगरसेवक व 33 लाख नागरिकांचा पाठींबा; मूठभर ठेकेदार कार्यकर्त्यांसाठी स्वच्छ संस्थेला हद्दपार करणार्‍या राजकारण्यांना चपराक !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात घरोघरी जावून कचरा गोळा करणार्‍या स्वच्छ सहकारी संस्थेचे काम काढून घेण्यात येउ नये, अशी मागणी तब्बल ११० नगरसेवकांसह शहरातील ६ लाख ६२ हजार ९७८ मिळकतधारकांनी केले आहे. काही मूठभर ठेकेदार कार्यकर्त्यांसाठी महापालिकेत सुरू असलेल्या ‘राजकिय’ प्रयत्नांना कष्टकर्‍यांवर विश्‍वास व्यक्त करून दिलेली ही चपराक असल्याचे बोलले जात आहे.

सुमारे साडेसहा हजार कचरा वेचकांनी एकत्र येउन स्थापन केलेल्या स्वच्छ सहकारी संस्थेमार्फत शहरातील ७५ टक्के घरांमधून ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यात येतो. पंधराहून अधिक वर्षापासून हे काम सुरू आहे. हे कर्मचारी या सेवेसाठी प्रत्येक मिळकतीचे महिन्याला ७० रुपये घेतात. यातून असंघटीत आणि गरीब साडेसहा हजार कुटुंबांना रोजगार तर मिळालाच आहे, तसेच शहर स्वच्छ राखण्यात त्यांची महत्वाची भुमिका आहे. परंतू मागील काही दिवसांपासून स्वच्छ संस्थेचे काम काढून घेउन निविदा प्रक्रिया राबविण्याचे प्रयत्न सत्ताधारी भाजपसह अन्य राजकिय पक्षांकडून होत आहेत. यासाठीच स्वच्छ संस्थेला केवळ एक महिना मुदतवाढ देण्यात आली असून हजारो कामगारांचे भविष्य अंधातरी टांगले आहे. केवळ काही मूठभर ठेकेदार कार्यकर्त्यांसाठी हे प्रयत्न असल्याचेच राजकिय कार्यपद्धतीवरून दिसून येत आहे.

स्वच्छ संस्थेने याला विरोध केला असून मागील काही आठवड्यांपासून विविध पद्धतीने आंदोलनही केले आहे. संस्थेने पाठींब्यासाठी घरोघरी जावून नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या आहेत. तसेच नगरसेवकांच्याही स्वाक्षर्‍या घेतल्या आहेत. तब्बल ६ लाख ६२ हजार ९७८ मिळकतधारकांनी अर्थात जवळपास ३३ लाख नागरिकांनी त्यांना पाठींबा दिला असून ११० नगरसेवकांनीही स्वच्छ संस्थेच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे. संस्थेच्यावतीने नागरिक , नगरसेवकांच्या स्वाक्षरींचे निवेदन आज महापौर, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष यांना दिले आहे.

आमच्या सोसायटीत मागील पाच ते सहा वर्षांपासून स्वच्छच्या कचरा वेचक महिला कचरा गोळा करण्याचे काम दररोज करत आहेत. स्वच्छचे समन्वयक देखील नियमितपणे कामाची पाहणी करतात. आमच्या संपर्कात राहून काही अडचणी असल्यास त्या त्वरित सोडवल्या जातात. कामावर येणे शक्य नसल्यास बदली कचरा वेचक येतात. सोसायटीतील रहिवासी देखील कचरा वेचकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना वेळोवेळी सहकार्य करतात. स्वच्छचे कचरा वेचक व समन्वयकांसोबत आमचे विश्वासाचे नाते तयार झाले आहे. यापुढेही त्यांचीच सेवा मिळण्यास आमचे प्राधान्य राहील.

– संजय भिडे, कोथरूड येथील रहिवासी

स्वच्छ संस्थेच्या कामाबद्दल काही भागातील नागरिकांच्या तसेच सभासदांच्या तक्रारी आहेत. स्वच्छचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच प्रशासनातील अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली जाईल. यामध्ये चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

– गणेश बिडकर (सभागृह नेता, पुणे महापालिका)