Pune News : नवीन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार 366 तक्रारी दाखल; ग्राहकांनी Lockdown काळात केला Online सुविधेचा वापर

पुणे : लॉकडाऊनमध्ये ग्राहक आयोगातील सुनावणी व इतर कामकाज बंद होते. मात्र ग्राहकांना आनलाईन तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे दाखल तक्रारींमध्ये ऑनलाइन स्वरूपाच्या तक्रारींचे प्रमाण मोठे आहे. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये नवीन कायद्यातील तरतुदीनुसार ३६६ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

नवीन ग्राहक संरक्षण कायद्याला २० मार्च रोजी आठ महिने पुर्ण होत आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ५४ तर आक्टोबरमध्ये ६० आणि त्यानंतर जानेवारीमध्ये ६७ तक्रार अर्ज दाखल झाले. तब्बल ३८ वर्षांनंतर या कायद्यात बदल करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यामध्ये ऑनलाइन खरेदीबाबत ई-कॉमर्स अंतर्गत विशेष तरतूद करण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक महिने इतर न्यायालयांप्रमाणे आयोगाचे कामकाज बंद होते. त्यामुळे तक्रारी प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र तरी देखील या काळात दावे जलद निकाली लागतील यासाठी प्रयत्न आयोगाकडून करण्यात आले. फेब्रुवारी २०२१ अखेर एक हजार ९२५ तक्रारी प्रलंबित आहेत.

२०२० मध्ये दाखल तक्रारी
जानेवारी – ५८
फेब्रुवारी – ३७
मार्च – ४३
एप्रिल – ००
मे – ००
जून – २४
जुलै -०७
ऑगस्ट -२१
सप्टेंबर -५४
आक्टोबर – ६०
नोव्हेंबर -४९
डिसेंबर -४८

२०१९
दाखल तक्रारी -६३१
निकाली -६४

२०२०
दाखल तक्रारी – ४०१
निकाली – २५

ग्राहकांना एखादी वस्तू अशा माध्यमातून खरेदी करायची झाल्यास ग्राहकाने विक्रेत्याच्या अधिकृत अँपमध्ये तपशील नोंदवावा. तसेच विक्रेत्याला वस्तू पुरवठा करण्याच्या ठिकाणाची माहिती द्यावी. वस्तू निवडल्यानंतर ग्राहकाने विक्रेत्यांशी वैध करार करून ग्राहकाच्या बँक खात्यामधून ती रक्कम विक्रेत्यांकडे सुरक्षित आणि पारदर्शक प्रणालीद्वारे हस्तांतरित करून त्याची नोंद ठेवावी.

उमेश जावळीकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग