Pune News : म्हाडाच्या घरांसाठी 90 हजार जणांची नोंदणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभाग गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (पुणे म्हाडा) पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाच हजार 647 सदनिकांसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची मुदत संपली. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आणि अर्ज भरलेल्यांसाठी अनामत रक्कम भरण्यारण्याची मुदत बुधवारी (दि.13) संपली आहे. त्यानुसार 90 हजार जणांची अधिकृतपणे लॉटरीसाठी नोंदणी झाली असून येत्या 22 जानेवारी रोजी ऑनलाइन लॉटरी जाहीर केली जाणार आहे.

म्हाडाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी सांगितले की, सदनिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली होती. मात्र, अर्ज भरलेल्यांसाठी अनामत रक्कम भरण्याची मुदत बुधवारी संपली. त्यानुसार 1 लाख 9 हजार 987 जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी 90 हजार जणांनी अनामत रक्कम भरली असून अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

नोंदणी केलेल्या अर्जांची ऑनलाईन लॉटरी जाहीर केली जाणार आहे. येत्या 22 जानेवारी रोजी नेहरु मेमोरियल सभागृह येथे ही प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच जिल्ह्यातील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती माने-पाटील यांनी दिली.