Pune News : न्यायमूर्ती रानडे यांच्यावरील लेखाचा पाठयपुस्तकात समावेश व्हावा – ज्येष्ठ पुरातत्वतज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  महाराष्ट्राची उन्नती व्हावी व सर्व क्षेत्रात जीवंतपणा यावा, असे कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केले. त्यांच्या कार्याचा व्याप मोठा होता. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकारणाचा विचार त्यांनी मांडला. अनेक संस्था देखील स्थापन केल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रोत्तेजक महादेव गोविंद रानडे असे म्हणायला हवे. त्यांचे कार्य आजच्या पिढीला माहित होण्यासाठी त्यांच्यावरील लेखाचा कोणत्याही इयत्तेच्या पाठयपुस्तकात समावेश व्हायला हवा, असे मत ज्येष्ठ पुरातत्वतज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर यांनी व्यक्त केले.

रमा-माधव रानडे स्मृती समितीतर्फे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या १२० व्या स्मृतीदिनानिमित्त देगलूरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे करण्यात आले. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ.दीपक टिळक, अविनाश चाफेकर , परशुराम परांजपे आदी उपस्थित होते.

डॉ.गो.बं.देगलूरकर आणि डॉ.दीपक टिळक यांच्या हस्ते न्यायमूर्ती रानडे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रबोधन पुरुष न्या.महादेव गोविंद रानडे याविषयावर देगलूरकर यांचे व्याख्यान झाले. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून जपानी भाषेचा प्रचार आणि प्रसार केलेल्या कार्याची दखल घेऊन जपान सरकारने डॉ.टिळक यांना विशेष सन्मानाने गौरविल्याबद्दल समितीतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ.गो.बं.देगलूरकर म्हणाले, नव्या सुधारणा व त्यांचा अंगिकार ही समाजाची त्याकाळची धारणा नव्हती. तरीही रानडेंनी विविध क्षेत्रात बदल घडविणारे कार्य केले. महाराष्ट्र उभा करण्याचे आणि चालविण्याचे काम त्यांनी केले. रानडे हे शब्दप्रामाण्यवादी नव्हते, तर ते बुद्धीप्रामाण्यवादी होते. त्यांना महाराष्ट्राने नीट समजून घ्यायला हवे होते. शांत व सहिष्णु स्वभावाचे ते होते. इंग्रजी सत्तेत न्यायमूर्ती असताना देखील त्यांनी देशकार्य केले. त्यामुळे त्यांचे कार्य तत्परतेने व तन्मयतेने समाजासमोर आणायला हवे.

डॉ.दीपक टिळक म्हणाले, न्यायमूर्ती रानडे यांनी अनेक समाजोपयोगी संस्थांची उभारणी केली. अशा महापुरुषाचे स्मरण झालेच पाहिजे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आजही समाजोपयोगी कार्य करीत आहे. त्या संस्थांनी एकत्र येत रानडेंचा विचार अधिक जोमाने पुढे न्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले. शर्वरी लेले यांनी स्वागत गीत सादर केले. श्रद्धा परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा जोग यांनी पसायदान सादर केले. प्रार्थना समाजाचे विश्वस्त डॉ.दिलीप जोग यांनी आभार मानले.