Pune News : लष्कर भरती प्रकरण ! मेजर दर्जाच्या अधिका-यांच्या पोलिस कोठडीत वाढ; टोलटोलवीची उत्तरे देत असल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे

पुणे : लष्कराच्या रिलेशन आर्मी भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फुटल्या प्रकरणात अटक केलेले मेजर दर्जाचे दोन्ही अधिकारी पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसून टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे पुढील तपासासाठी दोघांच्या पोलीस कोठडीत २० मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

विशेष न्यायाधीश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी याबाबत आदेश दिले. थिरू मुरूगन थंगवेलू (वय ४७, रा. वेलिंगटन, राज्य तमिळनाडू) आणि वसंत किलारी (वय ४५, रा. दिल्ली. मुळ रा. आंध्रप्रदेश) अशी या अधिका-यांची नावे आहेत. प्रश्‍नपत्रिका देण्याच्या बदल्यात किलारी याला २५ लाख रुपये देण्याचे ठरले होते, असे थिरू थंगवेलू याने तपसात सांगितले आहे. तर किलारी याच्याकडे केलेल्या तपासात त्याने प्रश्‍नपत्रिकेच्या बदल्यात पवन नायडु नावाच्या व्यक्तीला २५ लाख रुपये देण्याचे ठरले होते, असे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर, आणखी तिघांवर गुन्हा दाखल आहे.

लष्कराच्या रिलेशन आर्मी अंतर्गत पुण्यासह देशात ४३ ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेत देशभरातील ४० हजार उमेदवार बसले होते. मात्र, या परिक्षेची प्रश्‍नपत्रिका पुण्यात फुटली असल्याची माहिती लष्करी गुप्तचर (एमआय) विभागाने पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी थंगवेलू आणि किलारी यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

प्रश्‍नपत्रिका पाठवत असल्याचे किलारी याने केले कबुल

यासंदर्भात दोघांकडे तपास केला असता दोघे उपयुक्त माहिती देत नाहीत. थंगवेलु याला किलारी याने व्हॉट्‌सऍपवर प्रश्‍नपत्रिका पाठवल्या बाबत कबुली दिली आहे. मात्र, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोबाईलमधील डाटा डिलीट केला असून, त्याबाबत तपास करायचा आहे. थंगवेलु आणि किलारी यांनी तमिळ भाषेत संभाषण केलेले आहे. त्याबाबत देखील तपास करायचा आहे.