Pune News : कोंढव्यात तंबाखूचा साठा करणार्‍याचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुगंधित तंबाखूचा साठा करणा-‍याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला. बाबु गुंडाप्पा कांबळे (वय 42, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १० लाख ५४ हजार ८९० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश बबन खेसे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीन फेब्रुवारी रोजी गणेश पेठेतील लक्ष्मी निवासच्या तळघरातील गोदामात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी त्याने अर्ज केला. त्यास सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याला जामीन मिळाल्यास तो फरार होऊ शकतो. तसेच यास्वरुपाचे गुन्हे पुन्हा करू शकतो. त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला साडे दहा लाखांचा तंबाखूचा साठा त्याविरुद्धचा ठोस पुरावा आहे. त्याला जामीन मिळाल्यास तो तपासात अडथळा आणू शकतो. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ती मान्य केली.