Pune News : बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने भरारी पथके तयार, व्यावसायिकांनी सहकार्य करावे – CEO आयुष प्रसाद

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – बर्ड फ्ल्यू अर्थात एव्हीयन एन्फ्लूएन्झा या आजाराचा देशात शिरकाव झाल्यानंतर राज्यात कुकूटपालन व्यावसायिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली. या आजाराने परभणी जिल्ह्यात जवळपास आठशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाल्यावर पुणे जिल्ह्यात यावर तातडीची बैठक घेऊन पशुधन संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीची बैठक बोलावून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ शिवाजी विधाटे याच्यासह भरारी पथकाची स्थापना करुन या आजाराची सर्व माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आजपर्यंत अनेक वेळा या आजाराचा शिरकाव आपल्या देशात झाला होता परंतु याचा मानवी संसर्ग झाला नाही कारण याचा विषाणू 70 अंशाच्यावर तापमानात जीवंत राहत नाही भारतीय स्वयंपाक पध्दतीमध्ये मांस उच्च तापमानावर शिजवले जाते त्यामुळे या आजाराचा शिरकाव मानवामध्ये होण्याची शक्यता नाही. तरीही खबरदारीची उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात सर्वसाधारणपणे 1.50 कोटी कुकूटपक्षी आहेत.

उरुळी कांचन येथील पशुवैद्य डाॅ. ऋषीकेश शिंदे यांनी सांगितले की हवेली तालुक्यात कुकूटपालन व्यावसाय मोठा आहे. यातील व्यावसायिकांनी शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार सहकार्य करावे. तालुक्यात चार पथके नियुक्त केले असून नमुने गोळा करण्याचे काम चालू आहे. आपल्या परिसरात कोंबड्या बदके कावळे व अन्य पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्यावर त्वरित टोल फ्री क्र. 18002330418 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.