Pune News : निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे 91 व्या वर्षी पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत (वय 91) यांचे सोमवारी (दि. 15) निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी (दि. 16) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे वकिली आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

1930 मध्ये जन्मलेल्या सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविल्यानंतर सावंत यांनी सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात वकील म्हणून सराव सुरू केला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सहा वर्ष त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. 1995 मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या पी. बी. सावंत कमिशनचे अध्यक्ष देखील होते. तसेच सावंत यांनी पुण्यातील पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले होते.