Pune News : हडपसर-सासवड रस्ता ! पदपथ-सायकल ट्रॅक चोरीला गेले, नागरिक-वाहनचालक आले मेटाकुटीला

पुणे – हडपसर-सासवड रस्ता भेकराईनगरपर्यंत रुंदीकरण केल्यानंतर पदपथ आणि सायकटल ट्रॅकही केला. सुरुवातीला नागरिकांनी सायकलही चालविली. मात्र, अवघ्या काही महिन्यात सायकल ट्रॅक आणि पदपथाची जागा दुकानदार आणि वाहनचालकांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता नाही, सायकलचालकांना ट्रॅक शिल्लक नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्तारुंदीकरण करताना पदपथ आणि सायकलट्रॅक कोणत्या उद्देशाने केले होते, याचा खुलासा महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हडपसर-सासव़ड रस्त्याचे काँक्रिटीकरण, पदपथ आणि सायकलट्रॅक बनविण्यासाठी नागरिकांनी कररूपी भरलेल्या लाखो रुपयांची उधळपट्टी केली. त्याचा वापर अवघ्या काही दिवसात संपला. पदपथ आणि सायकलट्रॅकवर ट्रॅव्हल कंपन्यांची वाहने दिवसरात्र उभी असतात. पदपथावर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचारी आणि सायकलट्रॅक चोरीली गेल्याची तक्रार कोणाकडे द्यायची असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार सुरू आहे. तरीसुद्धा त्यातील एकालाही कोणी जाब विचारताना दिसत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

मागिल दहा महिन्यांपासून कोरोनाच्या सावटाखाली संपूर्ण जग अडकले होते. आता कोरोनाचा ज्वर कमी झाल्यानंतर कामगारवर्ग आणि नागरिक घराबाहेर पडू लागला आहे. मात्र, त्यांना रस्त्याने चालणे जिकीरीचे झाले आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येत नाही. पदपथ आणि सायंकलट्रॅक ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या वाहनांनी व्यापून टाकले आहेत, प्रभागाचा विकास म्हणजेच नागरिकांचा विकास असा धोशा लावणारे लोकप्रतिनिधी आता गेले तरी कोठे अशी विचारणा आता नागरिक थेट करू लागले आहेत.

कोरोना कालावधीमध्ये रोजगार इंडस्ट्री ठप्प झाली त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, अशी भयावह अवस्था सामान्य कामगारांची झाली आहे. महागाई दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. त्याबाबत कोणी अवाक्षर बोलत नाही. आरोग्याच्या समस्या जटील बनत आहेत. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी अनेक ठिकाणची अवस्था आहे. त्याकडे लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार आहेत, सामान्य नागरिकांनी किरकोळ कामासाठी त्यांच्या घराचे उंबरे झिजविल्यानंतरच काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. निवडणुकीच्या वेळी प्रत्येकाच्या दारोदार मत मागण्यासाठी जाता मग आता साधे पाणी देण्यासाठी का प्रयत्न करत नाही, अशी विचाऱणा अॅड. अमोल कापरे यांनी केली आहे.

फुरसुंगी उड्डाण पुल सतत जॅम

फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूककोंडी होत होती. म्हणून उड्डाण पुल उभारला. मात्र, दूरगामी विचार न करता उड्डाण पुल उभारल्याने आता या पुलावर सतत वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक कमालीचे मेटाकुटीला आले आहेत. उड्डाण पुलावरील पदपथ काढून रस्ता रुंदीकरण केले, तर वाहतूककोंडी समस्या सुटण्यास मदत होईल. त्यासाठी हडपसर वाहतूक विभागाकडून वारंवार रस्ते विभागाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप, त्याला मुहूर्त मिळाला नाही, त्यामुळे वाहनचालकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.