Pune News : अनैतिक संबंधामुळे ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यावर मोठी कारवाई

पुणे : जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेले एक पोलिस ठाणे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. कारण एका पोलिस कर्मचाऱ्याला महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध महागात पडले आहे. त्यानंतर थेट त्याच्या बदलीचे आदेशच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी काढले आहेत.

कामशेत पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षकासह सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि एका पोलिस कर्मचाऱ्याला एक लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) रंगेहात पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच दुसऱ्या प्रकरणात याच ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली. रामचंद्र कानगुडे असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पोलिस अंमलदार पदावर कार्यरत होते. आता त्यांची बदली झाली.

कानगुडे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत प्रभारी पोलिस निरीक्षक यांनी तक्रार अर्जाद्वारे मागील दोन दिवसांपूर्वी ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार, या प्रकरणाची दखल कानगुडे यांची कामशेत पोलिस ठाणे येथून ओतूर पोलिस ठाणे या ठिकाणी प्रशासकीय कारणास्तव बदली केली आहे.

दरम्यान, अनैतिक संबंध प्रकरणात पीडित महिलेबाबत गोपनीयता बाळगणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही ती महिला मावळ तालुक्यातील कोणत्या पदावर काम करत आहे. याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. महिलांविषयी जागरुक असणाऱ्या पोलिसांकडूनच असा प्रकार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.