Pune News : अटकेच्या भितीपोटी कुख्यात गुंड गजा मारणे अन् त्याची गँग ‘फरार’ – पुणे पोलिस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वारज्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कूविख्यात गुन्हेगार गजा उर्फ गजनान मारणे आणि त्याची पलटण फरार झाली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. पण ते अद्याप मिळालेले नाहीत. अटकेच्या भीतीने गजानन मारणे व त्याचे साथीदार फरार झाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय 55), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 36), बापु श्रीमंत बागल (वय 34), आनंता ज्ञानोबा कदम (वय 37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40) श्रीकांत संभाजी पवार (वय 34), सचिन आप्पा ताकवले (वय 32), संतोष शेलार अशी फरार झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तळोजा ते पुणे अशी शेकडो गाड्या घेऊन रॉयल इंट्री मारत दाखल होणं गजा मारणे व त्याच्या साथीदारांना चांगलेच महागत पडले आहे.

साथीदार आणि त्याच्या समर्थकांनी गजानन मारणेच्या प्रेमापोटी व उत्स्फूर्तपणे ही रॅली काढली खरी पण ती आता सर्वांच्याच अंगलट आली आहे. असेही बोलले जात असून आपली दहशत टिकवण्यासाठी गुंडांना असे उद्योग करावे लागतात. पण या उद्योगामुळे मात्र आता गजा मारणे व त्याच्या साथीदार हिटलिस्टवर आले असून, त्यांच्यावर या मिरवणुकीच्या अनुषंगाने पुणे, पिंपरी आणि खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांनी कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली. पण अटकेची कारवाई काही जास्त काळ टिकली नाही. न्यायालयाने गजानन मारणे व त्याच्या साथीदारांना जामिनावर सुटका केली. यानंतर पोलिसांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गजा मारणे व त्याचे साथीदारांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून शोध घेतला जात असताना गजा मारणे आणि त्याचे साथीदार सापडत नसल्याने पोलिसांनी गजा मारणे पोलिसांच्या अटकेच्या कारवाईने फरार झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.