Pune News : गडकोट किल्ल्याचे पावित्र्य राखा – दिलीप जगताप

पुणे : एकीकडे गड-किल्ल्यांवर, धबधब्यांवर दारुच्या बाटल्या घेऊन जाणारी तरुणाई आणि दुसरीकडे विविध माध्यमांमधून गड-किल्ल्यांच्या पावित्र्याबद्दल, अस्तित्वाबद्दल, इतिहासाबद्दल, सौंदर्याबद्दल जाणीवेतून कात्रज येथील सिद्धीविनायक ग्रुपच्या तरुणांनी नववर्षानिमित्त गडकोट किल्ल्याची स्वच्छता केली. तसेच छत्रपतींचे आपण मावळे आहोत, गडकोट किल्ल्याचे पावित्र्य राखा, असा संदेश दिला, असे मत कात्रजमधील जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप जगताप यांनी व्यक्त केले.

आठवड्याचे इतर दिवस फॉर्मल कपड्यांमध्ये, शूजमध्ये वावरणारे हे तरुण नव वर्षाच्या पहिल्या दिवशी हातात हँन्डगोल्ज, कापडी पिशव्या, फावडी घेऊन बाहेर पडताना दिसतात. त्यामुळे गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा सांभाळला जाईल, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. आतापर्यंत रायगड, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर अशा अनेक किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतलेल्या सिद्धीविनायक ग्रुपच्या वतीने या वर्षी लोणावळा येथील विसापूर किल्याच्या स्वच्छता मोहीम हाती घेतली. ग्रुपच्या वतीने रस्त्यावरुन जाताना पाऊल वाटा स्वच्छ करत असतानाच वेलींचा पडलेला वेढा, कागदाचे तुकडे, प्लॅस्टिक, आजूबाजूला असलेला कचरा उचलून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

जनहित फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड. दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीमेत गौरव येनपुरे, अक्षय खुटवड, प्रथमेश देशमुख, हर्षल मुळे, उत्कर्ष गाडे, अनिकेत पवार सहभागी झाले होते.

नानाविध समस्यांमुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व फक्त इतिहासापुरते मर्यादित राहिले आहे. वर्तमानात या ऐतिहासिक महत्त्वाला काडीमात्रसुद्धा किंमत मिळत नाही. महाराष्ट्रातील शेकडो किल्ले आज जिर्ण अवस्थेत आहेत. ज्या किल्ल्यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे, म्हणत आपण मिरवतो, दगडांच्या देशा म्हणत ज्या इतिहासामुळे आपण पेटून उठतो त्या किल्ल्यांची माहितीही आजकालच्या तरुणांना नसते. त्यामुळे लोकांबरोबरच युवकांमध्ये जनजागृती वाढावी म्हणून सालाबादप्रमाणे याही वर्षी किल्ले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
– सुरज बरदाडे – सिद्धीविनायक ग्रुप, कात्रज