Pune News : कुख्यात गजानन मारणेचे कोथरूडमध्ये स्वागत करणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षाला पडले महागात, आशिष साबळेला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुविख्यात गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृह ते पुणे दरम्यान रॉयल एन्ट्री मारल्यानंतर त्याचे कोथरूडमध्ये स्वागत करणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्षाला चांगलेच महागत पडले आहे. जिल्हाध्यक्ष आशिष साबळेला याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामुळे शहर व जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दोन खून प्रकरणात मोक्कानूसार कारवाई केल्यानंतर याप्रकरणात न्यायालयाने कुविख्यात गुंड गजानन मारणे व त्याच्या साथीदारांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात (सोमवारी, दि. 15) तो तळोजा कारागृहातून बाहेर आल्यानंतर समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली होती. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. गुन्हा दाखल करत अटक केली. न्यायालयाने यात त्याला जामीन दिला. पण आता या जंगी मिरवणुकीत सहभागी झालेल्या शेकडो गाड्या व समर्थक, साथीदार यांचा पोलीस शोध घेत आहेत. तपास सुरू आहे.

गजानन मारणे कोथरुडमध्ये आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आशिष साबळे उपस्थित असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखेने त्यास अटक केली. त्याला कोथरुड पोलीसांकडे सुपूर्द केले आहे.