Pune News : प्रकल्पग्रस्तांना भाडेतत्वावर दिलेल्या सदनिकांचा महापालिका भाडेकरार करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे महापालिकेने प्रकल्पबाधितांना भाडेतत्वावर दिलेल्या सदनिकांचे भाडेकरार करण्यात येणार आहेत. याचा प्रकल्पबाधितांसह महापालिकेला लाभ होणार असून महापालिकेला नियमीत उत्पन्न मिळणार आहे.

महापालिका आर्थिक मागास वर्गासाठीच्या (ईडब्ल्यूएस)आरक्षणाअंतर्गत ताब्यात आलेल्या सदनिका या रस्ता रुंदी अथवा महापालिकेच्या अन्य प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना भाडेतत्वाने देते. या सदनिकांसाठी ४५० रुपये प्रति महिना भाडे आकारणी केली जाते. मागील अनेक वर्षांपासून महापालिका ही प्रक्रिया राबवत असली तरी संबधित नागरिकांसोबत कुठलेही करार केलेले नाहीत. आजमितीला सुमारे १ हजार ५० सदनिका भाडेकराराने दिलेल्या आहेत. मात्र, यापैकी अनेकांनी सदनिकांचे भाडे थकविले असून ही थकबाकी साडेतीन कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे उत्पन्न घटले असताना सर्व विभागांच्यावतीने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्यावतीनेही उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मिळकतींचा योग्य वापर, त्यापासून मिळणार्‍या उत्पन्नाची थकबाकी वसुलीची मोहीत हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत ईडब्ल्यूएसच्या सदनिकांमध्ये राहाणार्‍या भाडेकरूंसोबत करार केले जाणार आहेत. या करारामुळे नागरिकांना भाडेकरू हक्काची वैधता मिळणार आहे. तसेच करारामुळे सदनिकांच्या मालकिसोबतच थकबाकी वसुली करण्यासाठी महापालिकेला विविध योजना राबविणे शक्य होणार आहे. यासाठी मसुदा फी भरून दुय्यम निबंधकांकडे या भाडेकराराची नोंदणी केली जाणार आहे. यासाठीचा खर्च हा संबधित भाडेकरूंना भरावा लागणार आहे. यासाठी विशेष मोहीमेअंतर्गत एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. साधारण १५ जानेवारीनंतर ही मोहीम सुरू करण्यात येईल. यातुळे सर्व नोंदी एकाच ठिकाणी होणार असून थकबाकी वसुलीस चालना मिळेल, अशी माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.