Pune News : काय सांगता ! इथं 8 तोळ्याच्या सोन्याच्या वस्तऱ्यानं केली जाते दाढी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकानं चक्क लोकांची दाढी करण्यासाठी 8 तोळ्यांचा सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे. सध्या याची खूप चर्चा सुरू आहे. आळंदीतील अविनाश बोरूदिया असं या व्यक्तीचं नाव आहे. अविनाश बोरूदिया 100 रुपयात सोन्याच्या वस्तऱ्यानं दाढी करून देतात. पिंपरी चिंचवड शहरासह, ग्रामीण भागातून हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि दाढी करून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.

अविनाश बोरूदिया हे मूळ व्यावसायिक आहेत. त्यांनी युवराज कोळेकर आणि विक्की वाघमारे या दोन तरुणांना सोबत घेत रूबाब नावाचं सलून सुरू केलं. अविनाश यांना काहीतरी हटके करावं अशी कल्पाना सुचली. त्यानुसार त्यांनी भारतीय संस्कृतीत महत्त्वाचं स्थान असलेल्या सोन्याच्या धातूची निवड केली. त्यांनी राजस्थानच्या कारागिरांकडून 8 तोळे सोन्याचा वस्तरा बनवून घेतला. याची किंमत तब्बल 4 लाख रुपये एवढी आहे.

मोठ्या थाटात या सलूनचं उद्घाटन करण्यात आलं होतं. अवघ्या 100 रुपयांत ग्राहकांची दाढी सोन्याच्या वस्तऱ्यानं केली जाते. हाहा म्हणत सगळीकडे याची चर्चा सुरू झाली. आता ग्राहक गर्दी करतानाही दिसत आहेत.

याबाबत बोलताना अविनाश यांनी भविष्यात आता सलूनमध्ये सोन्याची कात्री करण्याचा मानस आहे असं सांगितलं आहे. त्यामुळं आता काही दिवसांनी कटींगही सोन्याच्या कात्रीनं केली जाईल हेही नक्की आहे.