Pune News : मुंढव्यातील 2 वर्षांपुर्वीच्या गोळीबार प्रकरणाला फुटली वाचा, गुन्हेगार सचिन पोटे अन् सचिन शिंदेंविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील हॉटेल लाईनमध्ये उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या मुंढव्यात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाला आता वाचा फुटली असून, पोलिसांनी गुन्हेगार सचिन पोटे आणि सचिन शिंदे यांच्यासह साथीदारांवर याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान त्यावेळी देखील हे प्रकरण समोर आले होते. पण मुंढवा पोलिसांनी गोळीबार झालाच नाही, असे स्पष्ट केले आहे.

गेल्या महिन्यात ऑनलाइन क्रिकेट बेटींग प्रकरणात धमकावल्याप्रकरणी सचिन पोटे व अजय शिंदे यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अजय शिंदेला अटक केली होती. मात्र, पोटे फरार आहे. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर पब व हॉटेलचा भागीदार गुन्हे शाखेकडे आले होते. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल यांना गोळीबाराची माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना नेमकी काय आहे…
मुंढव्यात हॉटेल ‘वायकीकी’ असून, येथे पबही आहे. या पबला १५ जून २०१८ रोजी पोटे व त्याचे साथीदार पार्टीसाठी आले होते. त्यावेळी पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीत येरवडातील एकजण आले होते. यावेळी डिजेने त्या व्यक्तीच्या स्वागताची घोषणा माईकवर केली. त्यावेळी पोटेला राग आला व त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून त्या व्यक्तीच्या दिशेने गोळीबार केला. पोटे याने केलेल्या गोळीबारामुळे तेथे जमलेले सर्वजण घाबरले. त्यानंतर पोटे आणि साथीदारांनी पबची तोडफोड केली. हइ घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर पोटे याने डिव्हीआर चोरले. तर याबाबत कोणाला सांगितले तर मारण्याची धमकी दिली होती.