Pune News | पुण्यात असलेले देशातील एकमेव आसनस्थ बालाजी मंदिर भक्तांचे श्रध्दास्थान; पद्मासन मुद्रेत दगडी सिंहासनावर बालाजी विराजमान

पोलीसनामा ऑनलाइन : Pune News | श्री बालाजी (Shree Balaji Temple In Pune) हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती जगातील प्रसिध्द अशा तिरूपती बालाजी मंदिरातील उभी असलेली मनमोहक अशी मूर्ती. सर्वसामान्यपणे बालाजीची मूर्ती उभी असलेलीच आढळते परंतू ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुण्यातील भवानी पेठेत शेकडो वर्षे जुने असलेल्या बालाजी मंदिरात मात्र बालाजीची मूर्ती आसनस्थ आहे. विशेष म्हणजे आसनस्थ बालाजी विराजमान असलेले हे देशातील एकमेव असे मंदिर आहे.(Pune News)

श्री बालाजी मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत येणार्या या मंदिरात गुरू-शिष्य परंपरे नुसार महंत सेवा करीत आहेत. सध्या महंत रामस्वरूप दास आणि महंत लालदास बैरागी सेवा करीत आहेत. या ऐतिहासिक मंदिराविषयी महंत रामस्वरूप दास आणि महंत लालदास बैरागी यांनी ‘पोलीसनामा ऑनलाइन’ शी विशेष बातचीत केली. प्रस्तूत लेखात त्याचे काही अंश.

अशी आहे मूर्ती

महंत रामस्वरूप दास आणि महंत लालदास बैरागी यांनी सांगितले की, हे मंदिर जवळ जवळ साडे आठशे वर्ष जुने आहे. दगडाच्या सिंहासनावर पद्मासन मुद्रेत बालाजी बसलेली मनमोहक मूर्ती पाच फुटापेक्षा अधिक उंच आहे. मंदिरात सर्वप्रथम गोवीदास महाराज यांनी महंत म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती. त्यांना मंदिराची जागा इनाममध्ये मिळाली होती. पूर्वी मंदिराच्या आजुबाजुने खूप जागा होती परंतु कालांतराने लोकांनी तेथे आपली पक्की घरे बांधली. सध्या मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत मारूती मंदिर, भैरवनाथ मंदिर, गणपती मंदिर, शिवशंकर मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर आहेत. बालाजी मंदिराच्या मंहंतांची राहण्याची व्यवस्था समोर असलेल्या मारूती मंदिरात केली आहे.

पहाटे साडे पाच वाजता उघडण्यात येतो गाभारा

महंत रामस्वरूप दास आणि महंत लालदास बैरागी यांनी सांगितले की, दररोज पहाटे साडे पाच वाजता मंदिराच्या गाभार्याचे दरवाजे उघडण्यात येतात. त्यानंतर बालाजी मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येते. हवन करण्यात येतो. त्यानंतर सव्वा सात वाजता महाआरती होते. महाआरतीचा लाभ भक्त घेऊ शकतात. बालाजीला दररोज नैवेद्य दाखवण्यात येतो. विशेष म्हणजे हा नैवेद्य महंत स्वत:च्या हातांनी बनवतात.

धूमधडाक्यात साजरे केले जातात धार्मिक उत्सव

मंदिरात चैत्र राम नवमी, कृष्ण जन्म अष्टमी, गंगा दशहरा, दीपावली, राम नवमी, हनुमान जयंती, रथ सप्तमी धूमधडाक्या साजरी केली जाते. हनुमान जयंतीला होम हवन तसेच अखंड रामायण पाठ आयोजित करण्यात येतो. याशिवाय भजन, कीर्तन देखील होते. त्यानंतर भंडारा असतो. रथ सप्तमीला विभिन्न यज्ञ केले जातात. याच दिवशी सायंकाळी बालाजी मंदिराच्या परिसरात परिक्रमा केली जाते. यासर्व धार्मिक उत्सवांमध्ये विशेष उत्सव असतो तो म्हणजे गोपा अष्टमी. दीपावली नंतर कार्तिक शुक्ल पक्ष अष्टमी यादिवशी गोपा अष्टमी साजरी करण्यात येते. यादिवशी बालाजीला वेगवेगळ्या अशा 56 गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. यालाच अन्नकुट देखील म्हणतात. त्यादिवशी भक्तांसाठी भंडारा देखील असतो.

कधीकाळी भरत असे संतांचा मेळा

मंदिराजवळ राहणारे भक्त सागर मोहनपीसे आपल्या बालपणीच्या आठवणींबद्दल म्हणाले की, मला आठवतयं काही वर्षांपूर्वी मंदिरात महंत, नागासाधू तसेच संतांचा मेळा भरत असे. मोठमोठे यज्ञ होत असत. धार्मिक कार्यक्रम तर रोजच असायचे. पूर्ण परिसरात भक्तीपूर्ण वातावरण असे. आसपासचे लोक देखील यात सहभागी होत असत.

मंदिर जिर्णोध्दाराच्या प्रतीक्षेत

जवळजवळ साडे आठशे वर्ष जुने असलेले हे मंदिर गेल्याकाही वर्षांपासून जीर्ण झाले आहे. सन 2015मध्ये जिर्णोध्दाराच्या हेतुने मंदिराचा पुढील भाग पाडण्यात आला. परंतू आर्थिक समस्या, मंदिर ट्रस्टींमध्ये असणार्या सामंजस्याच्या अभावामुळे बांधकाम सुरू झालेच नाही. सध्या महंत मंदिराचा जीर्णोध्दार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील हेमंत उर्फ विकी काळे टोळीवर ‘मोक्का’! पुणे पोलिसांची चालु वर्षातील 17 वी कारवाई