Pune News : सिंहगड रोड परिसरातील सोसायटीत घुसले चोरटे, विरोध केल्यानंतर चाकू हल्ला, युवक 3 तास रक्ताच्या थारोळयात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिंहगड रोड परिसरात चोरीच्या उद्देशाने सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांना विरोध केल्यानंतर चौघांनी त्याच्या पोटात चाकू खुपसत हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात तो गंभीर जखमी झाली आहे. तबल 3 तास तो व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.

प्रमोद किसन घारे (वय 35) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद खरे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारे हे नऱ्हे येथील संकल्प सोसायटीत राहण्यास आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास पार्किंग मधून आवाज येत असल्याने घारे यांनी गॅलरीतून खाली वाकून पाहिले. यावेळी त्यांना त्यांच्या गाडीजवळ एक व्यक्ती संशयास्पद रित्या दिसली. ते तात्काळ खाली आले.

त्यावेळी एकजण त्यांच्या गाडीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होता. प्रमोद यांनी त्याला विरोध केला. यावेळी चोरट्यांत व त्यांच्यात झटापट झाली. हा प्रकार सुरू असताना काही अंतरावर उभे असलेले त्या चोरट्याचे इतर तीन साथीदार धावत आले. त्यांनी प्रमोद घारे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर एकाने चाकू काढून प्रमोद घारे यांच्या पोटात दोन वेळा चाकू खुपसला. यात घारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी चोरटे कंपाऊंड वरून उडी मारुन पळुन गेले. पण, रात्रीची वेळ असल्याने कोणालाच काही समजले नाही. यामुळे घारे हे पहाटे साडेतीन ते सहा या वेळेत रक्ताच्या थारोळयात पार्किंगमध्ये पडून होते. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना पाहिले त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी घारे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले व सिंहगड रोड पोलिसांना माहिती दिली. तीन तास पडून असलेल्या घारे यांनी यावेळी रक्तानेच चोरांनी हल्ला केला असल्याचे रस्त्यावर लिहून ठेवले होते.