Pune News : मुलीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास तीन वर्षे सक्तमजुरी

पुणे : मुलीच्या वाढदिवसानिमित्त घरी आलेल्या तिच्या 15 वर्षीय मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संजय राधाकिसन वाव्हळ (वय 57) असे त्याचे नाव आहे. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला.

याबाबत पिडीतेच्या आईने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 10 मे 2018 रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. पिडीता ही वाव्हळच्या मुलीची मैत्रिण आहे. आरोपीच्या लहान मुलीचा वाढदिवस असल्याने ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी, त्याने पिडीतेशी लैंगिक उद्देशाने जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपसातले. यामध्ये पिडीत मुलीची व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या तिच्या बहिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीदारांचे जबाब व सरकारी वकीलांनी सादर केलेला पुरावा ग्राह्य दरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी. डी. चव्हाण यांनी केला. त्यांना हवालदार बी. डी. थोरात यांनी सहाय्य केले.