Pune News : TikTok स्टार समीर गायकवाडची आत्महत्या; पुण्याजवळील केसनंद मधील प्रकार

शिक्रापुर : पुण्याजवळील केसनंद येथे राहणारा टिकटॉक (Tik-Tok) स्टार समीर गायकवाड याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे

पुणे शहराजवळील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड (वय 22) राहातो. तिथे त्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

समीरने आत्महत्या केल्याचं कळताच प्रफुल्ल गायकवाडने लोणीकंद पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर समीरला खाली उतरवून तात्काळ लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. तो म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवायचा. समीर हा ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याची रेडलाईट डायरीज ही ब्लॉगवरील मालिका चांगलीच गाजली होती. तो टिकटॉक स्टार म्हणूनही तरुणांमध्ये लोकप्रिय होता.