Pune News : सराईत गुन्हेगाराने सिगारेटने दिला कपाळावर ‘चटका

पुणे : नवीन घेतलेल्या गाडीची राईड न दिल्याने सराईत गुन्हेगाराने तरुणाच्या कपाळावर सिगारेटने चटका देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

योगेश देवीदास कांबळे (वय २३) आणि आश्विन भोसले (दोघे रा. हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुहास अभिमन्यू वाघमारे (वय १९, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. योगेश कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सुहास वाघमारे व त्याचा मित्र योगेश निर्मळ हे मोटारसायकलवरुन शुक्रवारी सकाळी जात होते. त्यावेळी वडगाव येथील रोकडोबा मंदिर येथे योगेश कांबळे याने त्यांना हाक मारुन थांबविले व गाडीच राईड मागितली. वाघमारे याने गाडी देण्यास नकार दिला. तेव्हा योगेश व आश्विन यांनी त्याला शिवीगाळ केली. योगेश याने सिगारेट पेटवून तिने फिर्यादी याच्या कपाळावर चटका देऊन जखमी केले. पोलिसात गेला तर याद राखा अशी धमकी दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कर्चे अधिक तपास करीत आहेत.